किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा त्यांचा हेतू होता; चंद्रकांतदादांचा गंभीर आरोप 

पुणे – पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यासाठी पुणे महापालिकेत शनिवारी भाजपा नेते किरीट सोमय्या आले, मात्र पालिकेच्या पायऱ्यांवरच शिवसैनिकांनी निदर्शने करत त्यांचा रस्ता अडवला.

यावेळी झालेल्या गोंधळात किरीट सोमय्या यांना धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे ते खाली पडले. सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून तातडीने सोमय्या यांना गाडीत बसविले आणि सोमय्या यांना परतावे लागले. गोंधळात खाली पडल्यामुळे सोमय्या यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

या हल्ल्याबाबत अनेकांनी विवेकवादी भूमिका घेवून या घटनेचा निषेध नोंदवला आहे तर काहींनी नेहमीप्रमाणे सोयीचे मौन बाळगले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी किरीट सोमय्या यांना ठार मारण्याचा हेतू होता असा गंभीर आरोप केला आहे. महापालिकेची सुरक्षा कुठे होती? पोलीस कुठे होते? असा सवालही पाटील यांनी यावेळी विचारलाय.

महापालिकेच्या आवारात आयुक्तांना भेटायला आलेल्या सोमय्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. एकजण दगड घेऊन धावत होता. सोमय्यांना मारण्याची पूर्ण योजना झाली होती. सत्य लपणार नाही. सोमय्या यांच्या हाताला दुखापत झालीय. त्यांच्या कंबरेला मार लागला आहे. आज त्यांना ठार मारण्याचाच हेतू होता. महापालिकेची सुरक्षा कुठे होती? पोलीस कुठे होते? केंद्र सरकारची सुरक्षा नसती तर आज सोमय्यांना श्रद्धांजली वाहावी लागली असती, असा हल्लाबोल पाटील यांनी केलाय.