‘मुख्यमंत्री म्हणजेच आमचा ‘विठ्ठल’ चांगला आहे, मात्र त्यांच्या अवतीभवतीचे बडवे वाईट आहेत’

मुंबई – महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांची बंडखोर वृत्ती पाहता शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असले तरी या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे कोणत्याही दबावाखाली दिसत नाहीत.

राज्यसभा निवडणूक आणि विधानपरिषद निवडणूक या काळात अपक्ष आमदार देवेंद्र भुयार चांगलेच चर्चेत आले आहेत. संजय राऊत यांनी त्यांच्या मतदानावर शंका घेतल्यानंतर त्यांनी शिवसेनेवर थेट टीका करायला सुरुवात केली. गेल्या दोन दिवसांमध्ये शिवसेनेत बंड झाल्यानंतर भुयार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भोवती असलेल्या बडव्यांमुळे ही फूट पडली असं ते म्हणाले आहेत.

ते म्हणाले, मुख्यमंत्री म्हणजेच आमचा ‘विठ्ठल’ चांगला आहे. मात्र त्यांच्या अवतीभवतीचे बडवे वाईट आहेत. शिवसेनेत याच बडव्यांमुळे फूट पडली आहे. हे बडवे मुख्यमंत्र्यांना कोणाशी भेटू देत नाहीत, कामे होऊ देत नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अवतीभवतीचे वातावरण आणि माणसं लवकरात लवकर बदलण्याची गरज आहे. आमचा विठ्ठल चांगला आहे, मात्र त्यांच्या अवतीभवती असलेल्या चारपाच बडव्यांनी त्याला घेरलंय. त्या बडव्यांमुळेच मातोश्री बदनाम होत आहे, अशी टीका आमदार देवेंद्र भुयार यांनी केली आहे.