वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरीमुळे 12 भाविकांचा मृत्यू

नवी दिल्ली- जम्मू आणि काश्मीरमधील वैष्णोदेवी मंदिरात आज पहाटे भाविकांची चेंगराचेंगरी होऊन 12 जण ठार तर अन्य 12 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत जाहीर केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

सामुदायिक आरोग्य केंद्राचे ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ गोपाल दत्त यांच्या म्हणण्यानुसार, मृत्यूच्या आकड्यांबाबत नेमकी माहिती अद्याप उपलब्ध नाही. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. जखमींना नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात किती जण जखमी झाले याचा नेमका आकडा समोर आला नाही.

चेंगराचेंगरी मुळे वैष्णोदेवी यात्रा थांबवण्यात आली आहे. नववर्षानिमित्त माता वैष्णोदेवी मंदिरात दर्शन घेण्यासाठी अनेक राज्यातून भाविक कटरा येथे पोहोचले आहेत. सणाच्या निमित्ताने माता वैष्णोदेवी मंदिरात (Mata Vaishno Devi Bhawan) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या इतर दिवसांच्या तुलनेत वाढते, त्यामुळे चेंगराचेंगरी कशी झाली, हेही कळू शकलेले नाही.