निवडणुकीची तयारी सुरू करा; निवडणूक आयोगाचे सरकारला पत्र

मुंबई : विधीमंडळाने एकमताने पारित केलेल्या ठरावानुसार आता वॉर्ड फेररचनेचे काम सुरु करा, असे पत्र राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) राज्य सरकारला (State Government) पाठवले आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC reservation) निवडणुका होणार नाहीत हा प्रस्ताव विधीमंडळाने एकमताने मंजूर करून वॉर्ड फेररचनांचे अधिकार नव्याने स्वत:कडे घेतले आहेत. निवडणूक आयोगाने या नव्या रचनांना मान्यता दिल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थात निवडणुका होतील. त्यासाठी प्रक्रीया सुरु करा, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

राज्य निवडणूक आयोगानं लिहिलेल्या पत्रानं आता नव्या चर्चांना उधाण येण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगानं निवडणुकांसाठी अशा प्रकारे घाई करण्यामागचं नेमकं काय, असाही प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केला जातो आहे. दरम्यान,3 मार्च रोजी सुप्रीम कोर्टानं राज्यातील निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात, असं म्हटलं होतं. तसंच ओबीरी आरक्षणाबाबातचा आयोगानं दिलेला अहवालही सुप्रीम कोर्टानं मान्य केला नव्हता. दरम्यान, 7 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात याबाबत पुढील सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

दरम्यान, वॉर्ड फेररचनेच्या कामाबाबातचं पत्र पाठवणं हा एक प्रक्रियेचा भाग असल्याचाही दावा केला जातोय. वॉर्डच्या फेररचनेचं काम हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखांना डोळ्यांसमोर ठेवून करणं आवश्यक असल्याची गरजही व्यक्त केली जाते आहे.