शेतक-यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील – गडाख

उस्मानाबाद – राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला आहे. मराठवाडा, प. महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या भागात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने मदत जाहीर केली आहे मात्र घोषित करण्यात आलेली मदत अतिशय तुटपुंजी असल्याची टीका शेतकरी आणि विरोधक करत आहेत.

दरम्यान, शेतक-यांना समृद्ध करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या झालेल्या नुकसानाची राज्य शासनाला जाणीव आहे त्यामुळे शेतक-यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन मृदा आणि जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे संपर्क मंत्री शंकरराव गडाख यांनी कळंब तालुक्यातील खोंदला इथं काल केलं.

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी आणि कळंब तालुक्यातील कोल्हापुरी बंधा-यांच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते. तेरणा आणि मांजरा नदीवरील 24 प्रकल्पांची एकाचवेळी दुरुस्ती करण्याचा शासनाचा मानस असून सर्व 24 प्रकल्पांचं सर्वेक्षण करण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्यासाठी 1 कोटी 25 लाख रुपये निधी तात्काळ मंजूर करून वितरीत करण्याबाबत आदेश दिले आहेत. संबधित अधिका-यांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे, असे आदेशही आपण दिले असल्याचं गडाख यांनी यावेळी सांगितलं.

हे ही पहा: