महिलांच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध – यशोमती ठाकूर

पुणे  : महिलांच्या विकासासाठी विविध योजना आणि कार्यक्रम राबविण्यात महाराष्ट्र राज्य कायमच अग्रेसर राहिले आहे. महिलांना केंद्रस्थानी ठेवणारे राज्याचे सर्वसमावेशक महिला धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले. कोरोना कालावधीत आरोग्य यंत्रणेसह विविध क्षेत्रात महिलांनी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचेही त्या म्हणाल्या.

पुणे येथे एफआयसीसीआयच्यावतीने कोरोना कालावधीत आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा मंत्री ॲड ठाकूर यांच्या हस्ते पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा उषा पुनावाला, राष्ट्रीय कुटुंब नियोजनच्या प्रमुख अवलोकिता माने, नुपुर पवार, पुजा आनंद आदी मान्यवर उपस्थित होत्या.

आरोग्य यंत्रणेतील महिलांनी कोरोना कालावधीत जिवाची पर्वा न करता केलेले कार्य कायम स्मरणात राहणारे आहे. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते, त्या कामात मनापासून दिलेले योगदान अत्यंत महत्वाचे आहे. कोरोना रुग्णसेवा करताना आरोग्य यंत्रणेतील महिलांनी दिलेल्या योगदानाला फार महत्व आहे. त्यामुळे या कर्तबगार महिलांचा सत्कार इतरांना निश्चितच सेवेची प्रेरणा देईल, असा विश्वास ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. राज्याच्या चौथ्या महिला धोरणात महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यादरम्यान पुजा आनंद यांनी आरोग्य क्षेत्रात कार्यरत महिलांच्या कार्याबाबत माहिती दिली. यावेळी विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या बहुसंख्य महिला या कार्यक्रमास उपस्थित होत्या.