ग्रामपंचायत निवडणूकीचा खर्च सादर करा; जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

पुणे : जिल्ह्यात १८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रेची कारवाई सुरू करण्यात येणार असून २० जानेवारी २०२३ पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.(Submit Gram Panchayat Election Expenses; Appeal by District Administration) .

पुणे जिल्ह्यामध्ये १८ डिसेंबर २०२२ रोजी २२१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीचा निकाल २३ डिसेंबर २०२२ रोजी जाहीर करण्यात आला आहे. या निवडणूकीमध्ये सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या २ हजार ७४ जागांसाठी ३ हजार ५३२ उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. तसेच ७६१ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत.

निवडणूक लढविणाऱ्या व बिनविरोध निवडून आलेल्या एकूण ४ हजार २९३ उमेदवारांनी त्यांचा निवडणूकीच्या खर्चाचा हिशेब २० जानेवारी २०२३ पर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी अथवा तहसिल कार्यालयात प्रतिज्ञापत्रासह जमा करणे आवश्यक आहे. खर्चाचा हिशोब प्रतिज्ञापत्रासह सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्याबाबतची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी त्यांच्या निवडणूकीच्या खर्चाचा हिशेब तातडीने सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी केले आहे.