‘एवढं लक्षात घ्या बोर्ड, फलक मराठीत लिहून मराठी अस्मिता जपली जात नाही’

पुणे : राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून या संदर्भात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यात येईल.

कामगार संख्या 10 पेक्षा कमी असलेल्या आस्थापना तसेच 10 पेक्षा अधिक असलेल्या आस्थापना, अशा सर्व आस्थापना, देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करतील. मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपी बरोबरच इतर भाषेतही लिहू शकतो.

महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाचे सर्वच स्थरातून स्वागत होत असताना अभिनेता सुमित राघवन याने मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. ‘इंग्लिश बद्दल तिरस्कार नाहीये. पण जी राज्याची भाषा आहे ती नको का जपायला. दुकानांची नावं मराठीत लिहिणं हे सगळं वरवरचं झालं. जो मराठीआहे त्याला किंमत आहे का भाषेची? मग अमराठी व्यापाऱ्यांच्या माथी का मारा? ही बळजबरी झाली नाही का? अवस्था बघा मराठी शाळांची? असं राघवन म्हणाले आहेत.

तर, मोलकरीण आणि ड्रायव्हरच्या मुलांबरोबर शिकतील का आमची मुलं? असं काही पालक म्हणताना ऐकलंय आम्ही. लै प्रेम आपल्याला इंग्लिशचे. चांगलं आहे, असावं. पण एवढं लक्षात घ्या बोर्ड, फलक मराठीत लिहून मराठी अस्मिता जपली जात नाही. आतून बदल घडला पाहिजे. जे दुरापास्त वाटतंय. अशी भूमिका सुमित राघवन याने मांडली आहे.