ठाकरेंना मोठा धक्का : निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सकाळपासून सुरु असलेल्या सुनावणीनंतर घटनापीठानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. शिंदे गटाला कोर्टाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोग पक्ष चिन्हाबाबत निर्णय घेऊ शकतो. याबाबत कोणतीही स्थगिती न देण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

या आधी ठाकरे गटाला आपली कागदपत्रं जमा करण्याचे निर्देश हे निवडणूक आयोगाने दिले होते. त्यावर ठाकरे गटाकडून दोन वेळा मुदतवाढीची मागणी केली होती. ही लढाई सर्वोच्च न्यायालयात असल्याने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती.

आता सर्वोच्च न्यायालयाच्या ग्रीन सिग्नलनंतर शिवसेनेच्या पक्षचिन्हाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेणार आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या वतीनं कागदपत्रं जमा करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ मागण्यात येणार का हे पाहावं लागेल. शिवसेना कुणाची याचा निर्णय येत्या महिना किंवा दीड महिन्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे.