राज ठाकरेंच्या सभेसाठी वसंत मोरे पुण्यातून औरंगाबादकडे रवाना 

पुणे –   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 1 मे रोजी औरंगाबादमध्ये ( Raj Thackeray Aurangabad Rally ) सभा घेणार आहेत. या सभेत ते नेमकं काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार केल्याने अवघ्या देशाचे लक्ष राज ठाकरे यांनी स्वतःकडे वेधून घेतले असून बेकायदेशीररित्या मशिदीवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांचा मुद्दा ( Mosque Loudspeakers ) राज ठाकरे यांनी उचलून धरला आहे. या पार्श्वभूमीवर आज नेमकी राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे राज्यातील जनतेसह सत्ताधारी लक्ष ठेवून आहेत.

या सभेसाठी मनसेचे मराठवाड्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात औरंगाबादेत दाखल होत आहेत. या सभेमुळे शहरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. औरंगाबादच्या महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सभा गाजवल्या होत्या. याच मैदानावरुन बाळासाहेबांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी केली होती. आता त्याच मैदानावर राज ठाकरे यांची सभा होतेय.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे (vasanat more)  हे औरंगाबाद येथील राज ठाकरे यांच्या सभेला जाण्यासाठी काही वेळापूर्वीच पुण्यातून रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत 40 ते 50 कार्यकर्ते देखील आहेत. शनिवारी राज ठाकरे जेव्हा पुण्यातून औरंगाबाद येथे जाण्यासाठी निघाले, तेव्हा वसंत मोरे त्यांच्यासोबत नसल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. परंतू त्यानंतर आपण राज ठाकरेंसोबत असल्याचा पुनरुच्चार स्वतः मोरे यांनी केला होता. वसंत मोरे यांना भोंग्याच्या भूमिकेविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, भोंगे काढणे हे सरकारचे काम आहे. 3 तारखेला आम्ही मंदिरात महाआरती करणार आहोत. राज ठाकरेंच्या आजच्या भाषणाची उत्सुकता सगळ्यांनाच असल्याचे मोरे म्हणाले.