सूर्यकुमार यादव बनतोय भारताचा नवा सिक्सर किंग; आकडे पाहून तुम्हीही व्हाल अचंबित

हैदराबाद : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) भारतीय संघाकडून खेळण्याची संधी उशिरा मिळाली असेल, पण तो फार कमी वेळात मोठे नाव मिळवत आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर तो अनेक नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. रविवारी हैदराबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात सूर्यकुमारने 36 चेंडूत 69 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. त्याच्या या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने एक चेंडू आणि 6 विकेट्स शिल्लक असताना विजय मिळवला.(Suryakumar Yadav is becoming India’s new sixer king)

29 डावात षटकारांचे अर्धशतक पूर्ण करणाऱ्या सूर्यकुमार यादवनेही वेगवान खेळीत 5 चौकार आणि 5 षटकार मारले. यासह, तो युवराज सिंगला मागे टाकत आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वात जलद 50 षटकार मारणारा खेळाडू बनला. सूर्याने आपल्या कारकिर्दीतील 29 वा सामना खेळून हा टप्पा गाठला, तर युवराज सिंगने आपल्या 31व्या सामन्यात हे स्थान गाठले. त्याचवेळी केएल राहुलही कारकिर्दीतील ३१व्या सामन्यात षटकार ठोकण्यात यशस्वी ठरला.

सूर्यकुमार भारतासाठी आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये एका डावात पाच किंवा त्याहून अधिक षटकार मारण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सूर्यकुमारने 29 सामन्यांच्या कारकिर्दीत चौथ्यांदा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक षटकार मारण्याची कामगिरी केली. केएल राहुल आणि विराट कोहली यांनी 4-4 वेळा असे केले असले तरी यासाठी त्यांनी सूर्यकुमारपेक्षा कितीतरी जास्त सामने खेळले आहेत.

एका डावात पाच किंवा त्याहून अधिक षटकार मारण्याच्या बाबतीत हिटमॅन रोहित शर्मा पहिल्या स्थानावर आहे. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये त्याने 11 वेळा अशी कामगिरी केली आहे. त्याचवेळी दुसऱ्या क्रमांकावर असलेला युवराज सिंग आपल्या कारकिर्दीत पाच वेळा अशी कामगिरी करू शकला. अशा स्थितीत तो दिवस दूर नाही जेव्हा ‘स्काय’ युवराजला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर येईल.