सहा बायका फजिती ऐका! ६ बायकांसोबत एकत्र झोपता यावे म्हणून पठ्ठ्याने बनवून घेतला चक्क २० फुटांचा पलंग

Brazil Man Build 20 Feet Bed For Wives: ब्राझीलमधील एका व्यक्तीने आपल्या पत्नींना खूश ठेवण्यासाठी एक अनोखी भेट दिली आहे. ब्राझीलमधील साओ पाउलो (Sao Paulo) येथे राहणाऱ्या आर्थर ओउर्सो (Arthur Ourso) या व्यक्तीला 6 बायका आहेत. आपल्या ६ बायकांसोबत एकत्र झोपता यावे म्हणून आर्थरने 20 फूट लांब पलंग बनवला आहे. हा पलंग बनवण्याचा खर्चही तुटपुंजा नव्हता. आर्थरने या खास पलंगासाठी 81 लाख 54 हजार रुपये खर्च केले आहेत.

आर्थर ओउर्सोचा हा बेड 20 फूट लांब आणि 7 फूट रुंद आहे. त्यात एकूण 950 स्क्रू आहेत. एवढा मोठा पलंग बनवायला खूप वेळ लागला. हा पलंग 15 महिन्यांत पूर्ण झाला. 12 लोकांनी मिळून हा पलंग बनवला आहे. आर्थरने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर 20 फूटांच्या या पलंगाचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, “नात्यात आनंद टिकवून ठेवण्यासाठी मी हे काम केले आहे, जे इतर कोणत्याही व्यक्तीसाठी कठीण असेल. मी जगातील सर्वात मोठा बेड बनवला आहे.”

जागा कमी असल्याने मोठा पलंग
आर्थरने स्थानिक मीडियाला सांगितले की, बसण्यासाठी जागा नसल्यामुळे त्याला बेड बनवण्याची कल्पना सुचली. त्याने सांगितले की, अनेक वेळा त्याला त्याच्या पत्नींसोबत बसण्यासाठी सोफा, डबल बेडवर जागा करावी लागत असते. त्यामुळे त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे अनेकवेळा जमिनीवर झोपावे लागले. आपल्या पत्नींना चांगले आयुष्य देण्यासाठी आर्थर नेहमीच काम करत असल्याचे त्याने सांगितले.

9 बायकांपैकी 3 घटस्फोटित
ब्राझीलच्या आर्थर ओउर्सोने 2001 मध्ये लुआनाशी पहिले लग्न केले. यानंतरही तो थांबला नाही आणि त्याने आणखी 8 लग्ने केली. नंतर त्याने आपल्या 3 पत्नींना घटस्फोट दिला. वास्तविक ब्राझीलमध्ये पुरुष अनेक स्त्रियांशी लग्न करू शकतात. बहुपत्नीत्वावर बंदी घालणारा कोणताही कायदा या देशात नाही. आर्थरने नुकतेच 51 वर्षीय ओलिंडा मारियाशी लग्न केले. याशिवाय इतर पत्नींमध्ये 27 वर्षीय लुआना काझाकी, 21 वर्षीय एमिली सूझा, 24 वर्षीय वाल्किरिया सँटोस, 51 वर्षीय ओलिंडा मारिया, 23 वर्षीय डमियाना आणि 28 वर्षीय जुनी अमांडा अल्बुकर्क यांचा समावेश आहे.