‘पत्रकार परिषदेतुन खुलेआम शीवीगाळ करणारे खा. राऊत महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहेत’

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut Press) यांनी काल पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील आणि राज्यातील भाजपवर हल्लाबोल (Raut Criticized BJP) केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्याविरोधातील सर्व प्रकरणे खोटी असल्याचा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला.

दरम्यान, राऊत यांच्या पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट होतील अशी आशा तमाम मराठी जनतेला होती मात्र या पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आरोप पाहिल्यानंतर जनतेचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला. यानंतर आता भाजप नेते राऊत यांची खिल्ली उडवत टीका करू लागले आहेत.

दरम्यान, राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत महिला पत्रकार उपस्थित असून देखील अतिशय खालच्या पातळीवरील भाषा वापरली. यावरून आता भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी शरसंधान केले आहे. आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपति वेंकैय्या नायडू यांना पत्र लिहुन संजय राऊत यांना ताकाळ राज्यसभेतून निलंबित करा अशी मागणी केली.

याबाबत माहिती देताना भोसले म्हणाले, पत्रकार परिषदेतुन खुलेआम शीवीगाळ करणारे शिवसेना खासदार संजय राऊत साधु संतांनी घडवलेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहेत. वेळोवेळी खालच्या दर्जाची भाषा वापरणार्या संजय राऊतांना राज्यसभा सदस्य या संवैधानिक पदावर राहण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही , राज्यसभेचे सभापति तथा उपराष्ट्रपती वेंकैया नायडू जी यांना पत्र लिहुन आम्ही विनंती केली आहे की अशा शिवराळ खासदार संजय राऊत यांना ताकाळ राज्यसभेतून निलंबित करावे.