तृतीयपंथीयांचा अपमान करणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर कार्यवाही करा – वंचित बहुजन आघाडी

पुणे – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर पातळी सोडून टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरेंवर पातळी सोडून टीका केली. मर्दानगी वर कलंक! हिजड्यांच्या प्रमुखांकडुन अजुन काय अपेक्षा.. बायला कुठला!! असं ट्वीट करत नितेश राणे यांनी सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडत टीका केली आहे.दरम्यान, या टीकेमुळे वंचित बहुजन आघाडीने नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रसिद्धीपत्रकात नेमकं काय म्हटले आहे ?

भाजपा आमदार नितेश राणे हे सातत्याने समाजात धर्म, जात व लिंग आधारित व्यक्तव्य करीत असून समूह-समूह, जाती-जातीत द्वेष व तेड निर्माण करीत असतात. त्यांचाच एक भाग म्हणून नितेश राणे यांचे तृतीय पंथीया बद्दलचे अपमान जनक वक्तव्य विकृतीचा भाग नसून प्रवृत्ती झाली आहे. अशी प्रवृत्ती समाजात लिंग, धर्म व जातीच्या नावाने द्वेष व तेड निर्माण करते.मा. सर्वोच्च न्यायालयाने अशी प्रवृत्ती रोखण्यासाठी पोलिसांना तत्काळ गुन्हे नोंदवा असे निर्देशित केले आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांच्या बेताल व अपमान जनक वक्तव्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याच्या ऐवजी शमीभा पाटील, वंचित बहुजन महिला व युवा आघाडीच्या सदस्या बंड गार्डन पोलिस स्टेशन पुणे, येथे गेले असता दमदाटी व अपमान जनक वागणूक पोलिसांनी दिली. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा तक्रार तर नोंदवली नाही वरून त्यांना फरफटत पोलीस स्टेशन समोरून पोलीस घेऊन गेले. हे अत्यंत बेजबाबदार व निंदनीय कृत्य पोलिसांनी केले. वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र याचा तीव्र निषेध करते व तक्रार नोंदवली नाही तर, वंचित बहुजन आघाडी न्यायालयीन मार्गाने आंदोलने करेल.