कांदळवन क्षेत्रात अतिक्रमण होणार नाही, यासाठी कडक पावले उचला – मंत्री सुधीर मुनगंटीवार

कांदळवन संवर्धनाचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध प्रजातींचे उद्यान विकसित करणार

Sudhir Mungantiwar– केंद्र सरकारप्रमाणेच राज्य शासनही पर्यावरण संतुलन आणि संवर्धनासाठी आग्रही आहे. कांदळवनाचे संरक्षण आणि संवर्धन हे महत्वाचे आहे. कांदळवन क्षेत्रात अतिक्रमण होणार नाही, यासाठी कडक पावले उचलावीत. तसेच कांदळवनाचे महत्व विद्यार्थी आणि सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कांदळवनाच्या विविध प्रजातींचे उद्यान विकसित करा. त्यातून जनजागृती करा. लोप पावत चाललेल्या प्रजाती वाचवण्यासाठी संवर्धन प्रकल्प हाती घ्या, असे निर्देश आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

महाराष्ट्र् कांदळवन आणि जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाची बैठक आज वनमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार मनीषा चौधरी, आमदार योगेश कदम, वन विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाळ रेड्डी, मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त अतुल पाटणे, कांदळवन प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक एस. व्ही. रामाराव, सहसचिव (वित्त) विवेक दहिफळे, मुख्य वनसंरक्षक उपवनसंरक्षक अनिता पाटील, विभागीय वन अधिकारी आदर्श रेड्डी, महाराष्ट्र सागरी मंडळाच्या पर्यावरण अभियंता ज्योती पाटील, संचालक (पर्यावरण) अभय पिंपरकर, सहआयुक्त (मत्स्य) युवराज चौगले, दांडा कोळी मासेमारी व्यावसायिक सहकारी संस्थेचे भिका कोळी याशिवाय, भारतीय तटरक्षक दल, कोकण विभागीय आयुक्त यांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच दूरदृष्यसंवाद प्रणाली द्वारे महाराष्ट्र वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, आपल्या राज्यात एकूण 20 प्रजाती आहेत. आपल्या राज्यासह देशातील कांदळवन प्रजातींचे उद्यान आपल्या राज्यात असावे. याशिवाय, गोराई, दहिसर येथील कांदळवन पार्कचे काम गतीने करा. कांदळवनासाठी ऊतीसंवर्धन तंत्राचा वापर करुन त्याच्या जतनासाठी काय करता येईल, याबाबत बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या् सहकार्याने संशोधन प्रकल्प हाती घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

कांदळवन संशोधनासाठी काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात अभ्यासासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यामध्ये अधिक सुलभता आणावी. खाऱ्या पाण्यातील मत्स्यपालनासाठी केंद्रीय खारेपाणी मत्स्यपालन संस्था, चेन्नई यांच्या प्रशिक्षित वर्गाकडून राज्यातील मत्स्यपालकांना राज्यातच प्रशिक्षण देता येईल अशी व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देशही मंत्री मुनगंटीवार यांनी दिले.

दलदलीच्या कांदळवन क्षेत्रात कांदळवन रोपवनाचे काम करणाऱ्या मजूरांवर आपत्ती ओढवल्यास त्यांना भरीव मदत द्यावी, कांदळवन क्षेत्रातील बदल तपासण्यासाठी एमआरसॅक यंत्रणेकडून अद्यावत उपग्रह नकाशे प्राप्त करुन घेऊन कार्यवाही करावी, बहुप्रजातीय मत्स्यबीज ऊबवणी केंद्रासाठी कांदळवन प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

केंद्र शासनाच्या मिश्टी प्रकल्प आणि अमृत धरोहर योजनेंतर्गत दोन प्रस्ताव पाठविले आहेत. त्याचा पाठपुरावा करावा, असे निर्देशही मंत्री मुनगंटीवार यांनी दिले. कांदळवन क्षेत्र वाढविण्यासाठी यंत्रणेने अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी रामाराव यांनी कांदळवन प्रतिष्ठानमार्फत हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

https://www.youtube.com/shorts/LLrVrVQpCd4

महत्त्वाच्या बातम्या-

“महिला आरक्षणावरील पंतप्रधानांचे वक्तव्य चुकीचे, कॉंग्रेसच्या काळातच महिलांना संधी दिली गेली”

सातारा जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची नियुक्ती; अजित पवार यांनी दिले नियुक्तीपत्र…

Shivsena : ठाकरेंची साथ सोडत मातब्बर नेत्यांनी केला शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश