बाळासाहेब भोळे होते त्याचाच फायदा घेऊन तुम्ही कार्याध्यक्ष झालात नाहीतर…; मनसेची टीका 

मुंबई – राज्यात सध्या सुरु असलेल्या घडामोडींवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष भाजपाच्या ‘ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही’ या टीकेला थेट प्रत्युत्तर दिलंय.

ते म्हणाले, हो बरोबर आहे, बाळासाहेब ठाकरे भोळे होते. त्यावेळी भाजपाने बाळासाहेबांना वेळोवेळी कसे फसवले हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे,” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच त्यामुळेच मी भाजपासोबत(BJP)  धुर्तपणे वागत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

मी भोळा नाही. माझे वडील भोळे होते. त्यांनीच माझ्या रक्तात हिंदुत्व भिनवलं आहे, पण हिंदुत्वाच्या आडून भाजपा त्यांचे जे डाव साधत होता त्याकडे बाळासाहेब कानाडोळा करत होते, मी तसं करणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या याच वाक्यावरून आता मनसेने त्यांना लक्ष्य केले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत ट्वीट केले असून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, खरच मा. बाळासाहेब भोळे होते त्याचाच फायदा घेऊन तुम्ही कार्याध्यक्ष झालात नाहीतर आयुष्यभर फोटोच काढत बसले असता असा जोरदार प्रहार देशपांडे यांनी केला आहे.