इतर देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्यामुळे भारतातील सर्व राज्यांना दक्षतेचा इशारा

मुंबई – चीन, दक्षिण कोरिया आणि जर्मनीत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्यामुळे देशातील सर्व राज्यांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील पुण्यासह सर्व प्रमुख शहरांमध्ये विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं असून लसीकरणाकडे नव्यानं लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिल्या आहेत.

परदेशातून येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये आणि संसर्गाचं प्रमाण अधिक असलेल्या भागात खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूवर आळा घालण्यासाठी जर्मनीच्या संसदेनं काल एक नवीन कायदा मंजूर केला. यामध्ये कोरोना प्रादुर्भावादरम्यान लावलेले बहुतांश निर्बंध दूर करण्यात आले आहेत. हा नवीन संसर्ग संरक्षण कायदा निर्माण करणं एक कठीण तडजोड होती असं आरोग्य मंत्री कार्ल लॉटरबॅक यांनी सांगितलं.

या कायद्याप्रमाणे सार्वजनिक वाहतूक, रुग्णालयं आणि निगा केंद्रांमध्ये मास्क परिधान करणं बंधनकारक असून दुकानं, रेस्टॉरंट आणि शाळांमध्ये हा नियम हटवण्यात आला आहे. सर्व कोविड-19 निर्बंध आता कालबाह्य होतील असं ते म्हणाले. लस घेण्यासाठी इच्छुक नसलेल्या गटाला संरक्षण देण्यासाठी संपूर्ण देशावर निर्बंध लादू शकत नाही असं लॉटरबॅक यांनी नमूद केलं.