उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत त्यांनी घात केला; आदित्य ठाकरेंचा बंडखोर आमदारांवर निशाणा 

मुंबई – राज्यात सत्तांतर झाले असून शिवसेनेतून बंडखोर आमदारांना सोबत घेऊन भाजपशी युती करणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्री झाले आहेत. दरम्यान, शिवसेनेतील बंडाचे धक्के अजूनही पक्षाला बसत असताना विरोधक देखील शिवेनेवर (Shivsena) रोज निशाणा साधताना दिसत आहेत. तर बंडखोर आमदार आणखी काही आमदार आणि खासदार सोबत येतील असा दावा करत आहेत.

या पार्श्वभूमीवर आता आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) निष्ठा यात्रे (Nishtha Yatra) दरम्यान संवाद साधताना बंडखोर आमदारांवर टीका केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत त्यांनी घात केला, असे याप्रसंगी आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांबाबत बोलताना म्हणाले. यावेळी आमदार गेले तरी शिवसैनिक आजही शिवसेनेसोबत कायम आहेत, असे शिवसैनिकांनी त्यांना सांगितले.

मागील दोन-अडीच वर्षांत जे काही काम झाले ते जनतेने पाहिले आहे. ज्यांच्यावर विश्वास टाकला, ज्यांना आम्ही सर्व काही दिले त्यांनीच आम्हाला धोका दिला, असा संताप व्यक्त करतानाच आदित्य ठाकरे यांनी, मतदारांनी चिन्ह पाहून निवडून दिलेले आमदार फुटतात म्हणजे देशात लोकशाही आता राहिली आहे का ? अशी खंतही यावेळी व्यक्त केली.

गेली अडीच वर्षे कोणावरही टीका न करता राज्यातील जनतेची सेवा केली म्हणूनच हे प्रेम मिळत आहे असे सांगत आदित्य ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांचे आभार मानले. लोकांचा आशीर्वाद आणि प्रेम घेण्यासाठीच ही यात्रा सुरू केल्याचे ते म्हणाले. यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि महिला आघाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.