१५-१६ आमदार विधीमंडळात आमच्याबरोबर राहीले आहे त्यांचे मला कौतुक आहे – ठाकरे 

Mumbai – विधिमंडळातील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली असून शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण जाण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्हासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यात कायदेशीर लढाई होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्के देणे सुरूच आहे.

या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद  घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, एक चर्चा सुरु आहे शिवसनेच्या चिन्हाबाबत. कायद्याच्या दृष्टीने बघतिलं तर धनुष्यबाण शिवसेनेपासून हिरावून घेऊ शकत नाही. मतदान पत्रिकेवर चिन्हं महत्त्वाचं आहे, पण हे धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसाची चिन्हं लोकं बघतात, माणूस बघुन मतदान करतात. नवीन चिन्हांचा विचार करत नाही हे मुद्दामून तुम्हाला सांगत आहे.असं ठामपणे ते म्हणाले.

ते म्हणाले,  एक आमदार गेला म्हणून पक्ष संपला का ? आमदार जाऊ शकतात पक्ष जाऊ शकत नाही. हा एक संभ्रम तयार केला जात आहे म्हणून लोकांना सांगत आहे यावर विश्वास ठेवू नका. विधीमंडळ पक्ष वेगळा आणि नोंदणीकृत पक्ष वेगळा. धनुष्यबाण बाबत कोणीही मनात संभ्रम ठेवू नका. ते १५-१६ आमदार विधीमंडळात आमच्याबरोबर राहीले आहे त्यांचे मला कौतुक आहे. अशी जिगरीची माणसे जिथे असतात तिथे विजय हमखास असतो. माझा न्याय मंदिरावर विश्वास आहे, न्यायदेवतेवर विश्वास आहे. लोकशाहीचे अस्तित्व किती मजबूत रहाणार आहे, देशाच्या पुढच्या वाटचालीला दिशा दाखवणारा उद्याचा निकाल असणार आहे.