‘आमच्या कुटुंबियांवर बोलणं ही मोठी बातमी असते, त्यामुळं लोक बोलत असतात’

औरंगाबाद- प्रत्येक संघटनेला बोलण्याचा हक्क आहे. त्यामुळे राज ठाकरेही बोलत आहेत. त्यांच्यावर आणि त्यांच्या सभेवर मला जास्त काही बोलायचे नाही. आमच्या कुटुंबियांवर बोलणं ही मोठी बातमी असते, त्यामुळं लोक बोलत असतात, असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लगावला आहे.

औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, राज्यात सध्या महागाईचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे इतर मुद्यांवर कोणाला काही बोलायचं आहे ते बोलू द्या, शिवाय कोणाला कुठं जायचं तिथं जाऊ द्या असं देखील त्या म्हणाल्या.

दरम्यान,जय श्रीराम’चा नारा वाढवत आता हनुमानही राजकीय व्यासपीठावर चर्चेचा विषय झाला आहे याकडे कसे पाहता हे असे विचारले असता खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या,‘ श्रद्धावान आहेच मी पण भारतीय संस्कृतीत गीता हे वर्तणुकीचे शिक्षण देते. पण सध्या धर्माचे सादर केले जाणारे दृश्यरूप भारतीय संस्कृती नाही.’