‘सुशिक्षित उमेदवारांना मत द्या’ असं सांगणाऱ्या शिक्षकाला Unacademy नं कामावरून काढलं

Unacademy : एडटेक फर्म अनॅकॅडमीने एका शिक्षकाला बडतर्फ केले आहे. करण सांगवान नावाच्या या शिक्षकाने वर्गादरम्यान विद्यार्थ्यांना केवळ सुशिक्षित उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन केले होते. आता या प्रकरणावरून वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात शिक्षण संस्थेचे प्रमुख रोमन सैनी यांनी ट्वीट करून माहिती दिली असून अशा प्रकारे वैयक्तिक भूमिका विद्यार्थ्यांसमोर मांडणं चुकीचं असल्याचं त्यांनी या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

 

Unacademy चे शिक्षण करण संगवान यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये करण संगवान आपल्या विद्यार्थ्यांना एका सुशिक्षित उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. तसेच, “अशा व्यक्तीला निवडून द्या ज्या व्यक्तीला गोष्टी समजत असतील. ती व्यक्ती फक्त नावं बदलण्यात इच्छुक नसेल”, असंही करण संगवान आपल्या ऑनलाईन वर्गात विद्यार्थ्यांना सांगताना दिसत आहेत.

दरम्यान, यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टीका केली आहे. सुशिक्षितांना मतदान करण्याचे आवाहन करणे गुन्हा आहे का? जर कोणी निरक्षर असेल तर वैयक्तिकरित्या मी त्याचा आदर करतो. पण लोकप्रतिनिधी निरक्षर असू शकत नाहीत. हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. निरक्षर लोकप्रतिनिधी २१ व्या शतकातील आधुनिक भारत कधीच घडवू शकत नाहीत.असं केजरीवाल यांनी म्हटले आहे.