“माझे भारताशी आणि येथील लोकांशी घट्ट नाते आहे”, एबी डिविलियर्स झाला भावूक

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) कडून खेळलेला दिग्गज क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने फ्रँचायझीने त्याला आणि सहकारी खेळाडू ख्रिस गेलला हॉल ऑफ फेममध्ये सामील केल्यानंतर अतिशय भावनिक संदेश दिला आहे.

आरसीबीद्वारे रविवार, २६ मार्च रोजी आरसीबी अनबॉक्स इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये फ्रँचायझीने डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेलची जर्सी कायमची निवृत्त केली आणि दोन्ही क्रिकेटपटूंना हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट केले. तर त्याचवेळी आरसीबीने आयोजित केलेला हा कार्यक्रम संपल्यानंतर डिव्हिलियर्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना एक अतिशय भावनिक संदेश दिला आहे.

इंस्टाग्रामवर त्याच्या अधिकृत खात्यावर काही फोटो पोस्ट करत डिव्हिलियर्सने लिहिले की, मला आणि ख्रिस गेलला २६ मार्च रोजी आरसीबी हॉल ऑफ फेममध्ये सामील करण्यात आले आणि आमचे जर्सी क्रमांक कायमचे निवृत्त करण्यात आले. जेव्हा माझी पत्नी आणि माझी मुले आरसीबी कॅम्पमध्ये दाखल होत होते, तेव्हा माझे हृदय आनंदाने भरले होते. मी याआधीही आरसीबीच्या कॅम्पच्या पायऱ्या चढल्या होत्या, पण यावेळी माझ्या भावना वेगळ्या होत्या. त्यावेळी माझे मन एका वेगळ्याच अवस्थेत होते.

२००३ पासून मी भारतात घालवलेल्या सर्व आठवणी समोर आल्या आणि माझे भारताशी आणि तेथील लोकांशी घट्ट नाते आहे. मी सदैव त्यांचा ऋणी राहीन. धन्यवाद विशेषतः विराट, धन्यवाद आरसीबी, धन्यवाद बंगळुरू, असेही डिव्हिलियर्सने पुढे लिहिले.