ठाकरे गटाचे दिवस फिरले? इंडिया आघाडीत लोकसभेच्या जागावाटपात मिळणार कमी जागा?

राम कुलकर्णी –  लोकसभा निवडणुक (Loksabha Election) असो किंवा विधानसभेच्या एव्हाना कुठल्याही निवडणुकीत जागा वाटपाचा प्रश्न मातोश्रीच्या चौकटीत सुटायचा. स्वाभिमानाने महायुतीतले प्रत्येक घटक पक्ष जागा वाटप सक्सेसफुल झाल्यानंतर मातोश्रीतुन बाहेर पडायचे. कधी स्व.बाळासाहेब ठाकरेंची साक्ष तर कधी स्व.प्रमोदजी महाजन, स्व.गोपीनाथराव मुंडेंची साक्ष, एक नव्हे दोन नव्हे तब्बल पंचेवीस वर्षे भाजप-शिवसेनेची युती कॉलर टाईट करून जागा वाटप करायची. बदलत्या राजकिय समीकरणानंतर मातोश्री आता ग्रामपंचायतीच्या जागा वाटपासाठी देखील महत्वाची राहिली नसुन लोकसभेच्या जागांसाठी तर मातोश्रीच्या मालकाला दिल्लीत सोनिया तळवे चाटण्याची वेळ आली. खा.संजय राऊत (Sanjay Raut) 23 जागा लढवणार छातीठोकपणे दावा करायचे. पण काल सोनिया काँग्रेसने त्यांना लाथाळताना 15 जागा देवु केल्या म्हणे. एवढेच नाही तर 05 जागेवरसुद्धा अंतिम समाधान उबाठांनी मानलं तर आश्चर्य वाटु नये. 2019 साली जनादेशाचा अवमान केवळ मुख्यमंत्रीपदासाठी उद्धवजी ठाकरेंनी केला परिणामी त्यांच्यावर आभाळाकडे बघण्याची वेळ आली हे मात्र नक्की.

भाजप आणि शिवसेना यांच्यातल्या युतीचा भुतकाळ पाहिला तर खरंच निवडणुका कुठल्याही असो सहज जागा वाटप युतीतुन व्हायचं. 90पासुन युती सर्व निवडणुका अगदी ग्रामपंचायतीच्यासुद्धा समन्वयातुन लढल्या जायच्या. हिंदुत्वाचा अजिंडा स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा असल्याने भाजपसोबत अभेद युती होती. स्व.प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे युतीचे शिलेदार असायचे. मात्र राजकारणात स्वार्थ जेव्हा तयार होतो अशा वेळी केवळ खुर्चीसाठी कशा प्रकारे माणुस धृतराष्ट्राच्या भुमिकेत जातो 2019 ला जनतेला पहायला मिळालं. त्या साली राज्यात विधानसभेच्या निवडणुका होताना ताणुन ओढुन का होईना शिवसेना-भाजप युती झाली होती. 2019 च्या सहा महिने अगोदर देशात लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या. त्यातही शिवसेना-भाजपची भक्कम युती खरं तर 18 लोकसभेच्या जागा शिवसेनेला केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे मिळाल्या हे त्रिवादी सत्य कुणी नाकारू शकत नाही.

खरं तर त्याच काळात भाजपाने शिवसेनेला बाजुला ठेवलं असतं तर लोकसभेला एकही जागा शिवसेनेची येवु शकली नसती पण युतीचा धर्म भाजपवाले नेहमीच पाळत आले. कालांतराने दुधाच्या घड्यात मीठाचा खडा टाकण्याचे काम मातोश्रीच्या मालकाने केलं. गंमत बघा, 2019 ला विधानसभा निवडणुक राज्यात झाली तेव्हा मतदारांनी भाजप-शिवसेनेला बहुमताने महाराष्ट्राची सत्ता करण्यासाठी जनादेश दिला होता. त्यातही एकट्या भाजपाचे 105 आमदार निवडुन आले होते. वास्तविक पहाता त्याचवेळी शिवसेना सोबत नसती तर एकटा भाजप इतर घटक पक्षांच्या मदतीने बहुमताने सत्तेवर आला असता. पण युतीचा धर्म पाळण्यासाठी नेहमीच भाजपा कटिबद्ध राहिलेला दिसुन येतो. 2019 चा सत्ता स्थापनेसाठी जनादेश मतदारांनी दिला असताना तत्कालीन राजकिय परिस्थिती उद्धवजींच्या स्वार्थी वृत्तीने बिघडुन टाकली. केवळ मुख्यमंत्री पदासाठी भाजपसोबत निवडणुका नंतर युती मोडली. खरं तर देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्यात निवडणूक पुर्व मातोश्रीत बैठक होताना मुख्यमंत्री पद शिवसेनेला देवु अशा प्रकारे कुठलाही शब्द बैठकीत ठरला नव्हता. पण उबाठा नेत्यांनी आम्हाला मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला याचं खोटं राजकारण बनवत महाविकास आघाडीत प्रवेश केला.

काहीच गरज नसताना शरदचंद्र पवार आणि सोनिया काँग्रेससोबत गेले. जिथे त्यांना मुख्यमंत्री पद मिळालं. उद्धवजींच्या आयुष्यातील हीच फार मोठी चुक ज्यांनी मुख्यमंत्री पद स्वत: स्विकारलं असं म्हटलं तर चुकीचं काहीच वाटणार  नाही. एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाचं मुख्य केंद्र मातोश्री म्हणुन ओळखल्या जायचं. त्याच मातोश्री मालकाने मुख्यमंत्री पद घेतल्यानंतर कशा प्रकारे स्वाभिमान गहाण ठेवुन मातोश्रीची राजकीय कळा गेली हे जनतेने पाहिले. त्यांचा मुख्यमंत्री पदाचा काळ भ्रष्टाचाराने कसा गाजला?हे सर्वांनी पाहिलं. अगदी सिल्वर ओकचं पायपुसणं स्वत:ला करून घेतल्यासारखं चित्र निर्माण झालं.

तत्कालीन काळात राष्ट्रवादीने देखील सत्तेसाठी संधी पहात उबाठा नेत्याचा वापर करून घेतला. ज्यामुळे यांच्या पुलाखालचे पाणी वाहुन गेले. महाविकास आघाडीविरूद्ध महायुती असं चित्र सद्या राज्यात असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या माध्यमातुन शिवसेना फुटली तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या माध्यमातुन राष्ट्रवादी फुटली. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व शेजारच्या समुद्रात फेकुन दिल्यानंतर एकनाथ शिंदे गट नाराज झाला आणि तत्वाची व विचाराची लढाई खेळण्यासाठी भाजपसोबत गेला. या सार्‍या भानगडीचा अधिक ऊहापोह करण्यापेक्षा वर्तमान स्थितीत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून उबाठाची होणारी फटफजिती जनता पहात आहे. आम्ही महाराष्ट्रात 23 जागा लढवणारच अशा प्रकारचा दावा अनेक दिवसापासुन संजय राऊत करत होते. मात्र जागा वाटपासाठी काल दिल्लीत बैठक झाली. त्यात काँग्रेसनं 15 जागा उबाठाला देवु केल्यानंतर बापरे किती वेळ मुळ स्वाभिमानी शिवसेनेवर आली? असं म्हणायला शंका येते. त्याहुन अधिक सांगायचे झालं तर लोकसभा निवडणुक असो किंवा विधानसभेच्या निवडणुका असो राज्यातील कुठल्याही निवडणुकीच्या जागा वाटप वाटाघाटी वर्षानुवर्षापासुन मातोश्रीच्या चौकटीत होत असायच्या. भाजपासहित घटक पक्षाचे नेते अंतिम निर्णय मातोश्रीवर जावुन घ्यायचे. पण आज गंमत बघा, येवु घातलेल्या लोकसभेसाठी मातोश्रीवरचा स्वाभिमान सोनियाच्या पायावर गहाण ठेवण्याची वेळ उबाठा नेत्यावर आली हे खरं राजकारणातलं दुर्दैव म्हणावे लागेल.

त्यांना 23 जागा तर काँग्रेस द्यायला तर तयारच नाही. 15 पेक्षा कमी जागेवर बोळवण होवु शकते. त्याच्यातही डॉ.प्रकाश आंबेडकरांच्या वंचित घटक पक्षाचा समावेश होवु शकतो. पण कालचा दिवस महाराष्ट्रातील स्वाभिमानी शिवसैनिकांनी पाहिला तेव्हा स्वर्गात देखील स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या डोळ्यात निश्चित आश्रु आले असतील की ज्या पवित्र बंगल्यावर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी मी आयुष्य घातलं तेच माझे वारसदार दिल्लीत जावुन सोनियाचे तळवे तेही लोकसभेच्या जागा वाटपासाठी चाटु लागले हे नसे थोडके. सत्तेसाठी राजकारण करणार्‍या लोकांना मुळात दृष्टीक्षेपात केवळ सत्ताच दिसत असते. विचार, स्वाभिमान सारा गहाण ठेवल्या जातो. या सार्‍या गोष्टी उबाठाच्या वर्तुळात सद्या पहायला मिळतात. काँग्रेसनं 15 जागेवरच उबाठाची बोळवण केल्याची माहिती मिळत आहे. पण वर्तमान राजकिय स्थितीमध्ये उबाठाची झालेली अवसानगलित गात्र अवस्था पहाता 05 जागा जरी त्यांना काँग्रेसने दिल्या तरी देखील समाधान मान्य क्रमप्राप्त राहिल. कारण महाविकास आघाडी युतीने निवडणूक लढवायची. खा.संजय राऊतांचे वक्तव्य काही दिवसापुर्वी असे होते की, महाराष्ट्रात काँग्रेसनं एकही जागा लोकसभेची निवडणूक जिंकली नाही? परिणामी काँग्रेसला अस्तित्व नसल्याचे ते भासवत होते. पण आता वाटाघाटी अंतिम टप्यात आल्यानंतर मातोश्रीचा स्वाभिमान गेला कुठे? आणि गहाण ठेवण्याची वेळ का आली? या सार्‍या गोष्टीचे आत्मपरीक्षण उबाठा नेत्यांनी केलं तर 2019ला केवळ मुख्यमंत्री पदासाठी केलेली गडबड हीच खर्‍या अर्थाने उद्धवजींच्या आयुष्यातली राजकिय चुक ज्याचा बोध त्यांना आज ना उद्या निश्चित होईल.