एका लग्नाची भावनिक गोष्ट, वहिनीला आधार देत काकाच बनला चिमूकलीचा बाबा

कोरोना आला आणि प्रत्येकाचे आयुष्य बदलून गेले. जीवन जगण्याची पूर्ण पद्धतच बदलून गेली. अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले. अनेकांचा जीवनसाठी त्यांना सोडून गेले. कित्येक संसार उद्ध्वस्त झाले. कित्येक चिमुकल्यानी आपल्या आई-वडिलांना गमावले. अहमनगर जिल्ह्यातील अकोले गावातील शेटे कुटुंबावर देखील असाच दुखांचा डोंगर कोसळला, त्यांचा मोठा मुलगा नीलेश कारभारी शेटे यांच्या वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी निधन झाले.

नीलेश एका आश्रम शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता, ऑगस्ट महिन्यांत तेथील विद्यार्थी आणि शिक्षक यांना कोरोनाची बाधा झाली. त्यातच नीलेशचे निधन झाले. नीलेश यांची पत्नी पुनम वय वर्ष 23 आणि त्यांची अवघी 19 महिन्यांची चिमुकली, याचं आता कसं होणार असा प्रश्न शेट कुटुंबासमोर उभा राहिला.नीलेशचा छोटा भाऊ समाधान याने मनांची हिंमत बांधली आणि वाहिनीशी लग्न करण्याचे ठरविले. तसेच पुतणीचे पालकत्व देखील स्वीकारले.

पुनमसाठी देखील हा निर्णय घेणे प्रचंड अवघड होते. पुनमने देखील सामंजस्यपणा दाखविला आणि तिने देखील लग्नाला परवानगी दिली. या लग्नसोहळ्याची संपूर्ण तालुक्यात चर्चा रंगली आहे. कुटुंबाने देखील या प्रकरणात मोठा पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शेटे कुटुंबातील दुखांचे दिवस आता सरले आहेत आणि आनंदी वातावरण आता निर्माण झाले आहे. चुलते, वडील आणि पुनमच्या माहेरच्या लोकांच्या पाठिंब्यामुळे हा विवाह होऊ शकला. म्हाळसादेवी मंदिरातील खंडोबा मंदिराच्या प्रांगणात हा विवाह सोहळा पार पडला.

कोरोनामुळे अनेक तरुण मुलीनी आपल्या पतीला गमावले आहेत. अनेकांनी आपली पत्नी देखील गमावली आहे. अशा स्त्री -पुरुषांना मानसिक आधाराची फार गरज असते. समाधानने योग्य पाऊल उचलत समाजापुढे एक आदर्श उभा केला आहे.