स्पर्धा – परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनाची कैफियत सांगणाऱ्या बहुचर्चित ‘यथावकाश’चे पहिले गाणे लवकरच होणार रिलीज

पुणे:-  पुण्यातील सदाशिव पेठेच्या अरुंद गल्ल्यांमध्ये मागील कित्येक वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मिळून त्यांची कैफियत सांगण्यासाठी बनवलेला बहुचर्चित ‘यथावकाश’ नावाचा हा सिनेमा.येत्या नवंवर्षात जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे.या सिनेमाचे दिग्दर्शन नुकतेच तहसीलदारपदी निवड झालेले आणि रिल ‘यथावकाश’ची रियल लाईफ जगणारे अविनाश शेंबटवाड यांनी केले आहे.

यामध्ये प्रमुख भूमिकेत प्रसिद्ध युट्युबर जीवन आघाव व उपजिल्हाधिकारी सायली सोळंके या आहेत.त्यांच्यासोबत सुनील गोडबोले व अजित अभ्यंकर यांसारख्या मुरलेल्या आणि तगड्या कलावंतांचा देखील समावेश या चित्रपटामध्ये आहे.स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील दाहक वास्तव हा सिनेमा प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो.

या सिनेमाची संपूर्ण टीम ही स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी विद्यार्थी आहेत.शेवटी आपली कहाणी आपणच जगाला सांगणार असं दिग्दर्शक अविनाश शेंबटवाड आणि त्यांच्या टीमचं या चित्रपटाच्या कल्पनेबद्दल म्हणणं आहे.हा चित्रपट मराठी व्हायरल फिवर ( mvf ) या यूट्यूब चॅनलवर येत्या जानेवारीत प्रदर्शित होईल.या चित्रपटाचं पहिलं गाणं ‘लाल दिव्याची गाडी’ हे येत्या ३ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.