कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा संभाव्य धोका टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई – दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या नवीन कोरोना व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा एकदा भितीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. नवा व्हेरिएंट अधिक धोकादायक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. या व्हेरिएंट करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही अधिक वेगाने पसरणारा असून तो अधिक घातकही आहे. नुकतंच B.1.1.529 या व्हेरिएंटला जागतिक आरोग्य संघटनेने ओमीक्रोन असं नाव दिलं आहे.

दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये कोविड-19 चा नवा घातक व्हेरियंट सापडल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार नुकतीच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे तातडीची बैठक घेतली. बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांचेसह ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, सर्व महापालिका आयुक्त, मुख्याधिकारी उपस्थित होते.

यानंतर मुंबई महापालिकेने ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. ओमिक्रॉन व्हेरियंट बाधित आढळल्यास संबंधित इमारत सील करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली.