भारतीय रिझर्व्ह बँकेनं सुरक्षा ठेव लॉकर्सच्या करारांचं नूतनीकरण करण्याची मुदत वाढवली

RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) सध्या अस्तित्वात असलेल्या सुरक्षा ठेव लॉकर्सच्या (Safety deposit lockers) करारांचं नूतनीकरण करण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. अजूनही बहुसंख्य ग्राहकांनी नूतनीकृत करारावर स्वाक्षरी केलेली नाही तसंच बँकांकडूनही बऱ्याच ग्राहकांना याबाबतची माहिती दिली गेलेली नाही हे लक्षात घेऊन मुदत वाढवल्याचं रिझर्व्ह बँकेनं पत्रकाद्वारे कळवलं आहे.

एकंदर करारांपैकी 50 टक्के 30 जूनपर्यंत तर सप्टेंबर अखेर 75 टक्के करारांचं नूतनीकरण पूर्ण करा असं रिझर्व्ह बँकेनं बँकांना सांगितलं आहे. एक जानेवारीपर्यंत नव्यानं करार न केल्यामुळे ज्या ग्राहकांचे बँक लॉकर्स गोठवण्यात आले आहेत ते लगेचच पुन्हा सुरू करण्याची सूचना बँकेनं दिली आहे.