टीम इंडियामध्ये भांडणे! त्यामुळे मोठ्या टूर्नामेंटमध्ये फ्लॉप होत आहेत; पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा दावा

Rashid Latif On Team India: गेल्या जवळपास 10 वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघ एकही आयसीसी ट्रॉफी (ICC Trophy) जिंकू शकलेला नाही. जरी, टीम इंडिया आयसीसी टूर्नामेंटच्या बाद फेरीत पोहोचत असली तरी ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरली आहे. त्याचबरोबर यंदाचा विश्वचषक भारतीय भूमीवर होणार आहे. भारतीय चाहत्यांना त्यांच्या संघाकडून खूप अपेक्षा आहेत, पण रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघ अपेक्षा पूर्ण करू शकेल का? असा प्रश्न असताना पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज राशिद लतीफने टीम इंडियावर मोठे वक्तव्य केले आहे.

रशीद लतीफने आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की टीम इंडिया आयसीसी ट्रॉफी का जिंकू शकत नाही? वास्तविक, रशीद लतीफचा असा विश्वास आहे की भारतीय क्रिकेट संघ अंतर्गत कलहाचा सामना करत आहे. याशिवाय त्याने विराट कोहलीवर आपली बाजू मांडली. तो म्हणाला की, विराट कोहलीने कर्णधारपद सोडले तेव्हापासून भारतीय संघाचे मधल्या फळीतील फलंदाज सतत संघर्ष करत आहेत. यामुळे भारतीय संघ आयसीसी स्पर्धांमध्ये सातत्याने निराशाजनक कामगिरी करत आहे.

विराट कोहली एका दिशेने काम करत होता, त्याला जिंकायचे होते, पण त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले, असे रशीद लतीफचे म्हणणे आहे. आता टीम इंडियाला अंतर्गत समस्यांमुळे चांगली कामगिरी करता येत नाही. कर्णधार म्हणून विराट कोहलीने आयसीसी स्पर्धेत चांगली कामगिरी केली नाही, शक्यतो जे खेळाडू हवे होते ते संघात सापडले नाहीत, किंवा सापडले तरी कामगिरी करू शकले नाहीत, असे तो म्हणाला. मात्र, पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज म्हणाला की, येत्या काही दिवसांत दोन मोठ्या घटना घडणार आहेत. श्रीलंकेत आशिया कप आणि भारतीय भूमीवर विश्वचषक. भारतीय संघात चांगले खेळाडू आहेत, हा संघ जिंकण्यासारखा संघ आहे, पण नंबर-4 वर काम करावे लागेल. चौथ्या क्रमांकावर चांगला फलंदाज हवा.