लोबो यांनी भाजप सोडून पक्षावर एकप्रकारे उपकारच केले; उर्फान मुल्ला यांची खोचक टीका

मडगाव – मायकल लोबो हे सध्या भाजपच्या नेत्याचे नाव न घेता आरोप करतात, जर त्यांना हिंमत असेल तर त्यांनी स्पष्ट नाव घ्यावे, असे जाहीर आव्हान भाजपने दिले आहे. मायकल लोबो यांनी भाजप सोडून भाजपवर मोठे उपकार केले आहेत. ते अनेक प्रकरणात गुंतले होते व त्यामुळे भाजपची बदनामी होत होती असा आरोप विधान भाजपचे प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी केला आहे.

मडगावात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उफन मुल्ला यांनी मायकल लोबो यांच्यावर जोरदार आरोप केले. मायकल लोबो सध्या वैफल्यग्रस्त बनले असून भाजपच्या नेत्यावर टीका करतात. मात्र, त्यांना भाजपच्या नेत्याचे नाव घेण्याचे धाडस होत नाही. ‘सदरा’ किंवा ‘कुर्ता’ घालणारे पडद्यामागून सरकार चालवितात, असा आरोप ते करीत असतात. जर त्यांना धाडस असेल तर त्यांनी जाहीर नाव घ्यावे व त्यानंतर उद्भवणाऱ्या प्रकाराला सामारे जाण्याची तयारी ठेवावी, असे जाहीर आव्हान उर्फान मुल्ला यांनी दिले.

मायकल लोबो भाजप सरकारात कचरा मंत्री होते. ते ड्रग्स, बेश्या व्यवसाय, जमीन हडप करणे इत्यादी गैरप्रकारात गुंतले होते. त्यामुळे विरोधी पक्षात असताना आपण स्वतः तसेच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई हे त्यांच्यावर सातत्याने आरोप करीत होते त्यामुळे भाजपची बदनामी होत होती असं देखील ते म्हणाले.

लोबो यांनी भाजप सोडून पक्षावर एकप्रकारे उपकारच केले आहेत. कारण, सरकारात मंत्री असल्याने त्यांना काढून टाकणे पक्षाला कठीण जात होते. त्यात ते अल्पसंख्याक असल्याने, अल्पसंख्याकांवर अन्याय केल्याची भावना निर्माण झाली असती. मात्र, त्यांनी पक्ष सोडल्याने सुंटी वाचून खोकला गेला असे मुल्ला म्हणाले.