मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ मधून येवल्यातील दोन रस्त्यांना मिळणार झळाळी

नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या विशेष पाठपुराव्यातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्य अंतर्गत येवला तालुक्यातील दोन रस्त्यांची दर्जोन्नती करण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या अंतर्गत देवळाने ते पिंपळखुटे व देशमाने ते आडगाव रेपाळ या दोन रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली असून यासाठी १६ कोटी १८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

येवला मतदासंघांतील नागरिकांना दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा सूरू आहे. त्यातून मतदारसंघात विविध ठिकाणी रस्त्यांनी कामे चालू असून अनेक कामांसाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. यातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ आशियाई विकास बँक अर्थसहाय्य अंतर्गत येवल्यातील दोन रस्त्यांना मंजुरी मिळाली असून लवकरच या कामाला सुरुवात होऊन या रस्त्यानं झळाळी मिळणार आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ आशियाई विकास बँक अर्थसहाय्य अंतर्गत येवला मतदार संघातील देवळाणे, देवठाण ते पिंपळखुटे (बु.), चव्हाण वस्ती रस्ता देवळाणे ते देवठाण, इजिमा- १८८ या १० किलोमिटर रस्त्यासाठी ७ कोटी ७ लक्ष ६६ हजार इतका निधी तर पाच वर्ष देखभाल दुरुस्तीसाठी ३२.१६ लक्षच्या कामास मंजुरी मिळाली आहे.

तसेच देशमाने (बु.), शिरसगांव लौकी, लौकी शिरसगांव, आडगाव रेपाळे या १३ किलोमिटर रस्त्यासाठी ९ कोटी १० लक्ष ७७ हजार निधी तर पाच वर्ष देखभाल दुरुस्तीसाठी ३८.७८ लक्ष रुपये निधीच्या कामास मंजुरी मिळाली आहे. या कामांना लवकरच सुरुवात होणार असून कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना दळणवळणाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहे.