हिंदुस्तानी भाऊच्या हाकेला हजारो विद्यार्थ्यांचा प्रतिसाद; राज्य सरकारच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर

मुंबई : परीक्षा ऑनलाईन घ्यावी या मागणीसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद येथे विद्यार्थी या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. तर, धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केल्याचं समोर आलं आहे.

आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर हजारो विद्यार्थी जमा झाले आणि त्यांनी वर्षा गायकवाड यांच्या घराला घेराव घालत सरकारविरोधात जोरदार घोषबाजी सुरू केली. काही दिवसांपूर्वीच परीक्षा ऑफलाईनच होणार असे शिक्षणमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर आज विद्यार्थी त्याविरोधात आक्रमक झाले आहेत.

कोरोनाकाळात परीक्षा ऑफलाईन घेण्याला विद्यार्थ्यांचा जोरदार विरोध पहायला मिळात आहे, त्यामुळे सरकार आता निर्णय बदलून परीक्षा ऑनलाईन घेत विद्यार्थ्यांची मागणी मान्य करणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, महत्वाची बाब म्हणजे या आंदोलनामागे हिंदुस्तानी भाऊ (Hindustani Bhau) या नावाने परिचित असलेला विकास पाठक (Vikas Pathak) हा व्यक्ती असल्याचं सांगितले जात आहे.

राज्यात कोरोनाचं सावट आहे. अद्यापही हजारो विद्यार्थ्यांचे लसीकरण बाकी आहे. अशावेळी दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. मात्र, परीक्षा ठरलेल्या वेळेतच होईल असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर आज परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी हिंदुस्तानी भाऊकडून करण्यात आली होती. तसंच त्याने विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्याचं आवाहनही केलं होतं. हिंदुस्तानी भाऊच्या या आवाहनाला हजारो विद्यार्थ्यांनी पाठिंबा देत विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलं असल्याचं सांगितले जात आहे.

आज तीन महिने झाले हे विद्यार्थी वर्षा गायकवाड यांना सांगत आहेत. विद्यार्थ्यांचा आवाज त्यांनी ऐकला नाही. त्या विद्यार्थ्यांनी आज माझ्या आवाहनाला प्रतिसाद दिला तर मी वाईट झालो का? असा सवाल हिंदुस्तानी भाऊने केलाय.