आम्ही काय बघावं, अथवा बघू नये, हे ठरवायला…; आस्तादनं फेसबुक पोस्ट लिहित स्पष्ट मतं मांडलं

Har Har Mahadev Controversy: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे शूर मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) हा सिनेमा सध्या वादात सापडला आहे. या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड केली गेली असल्याचे आरोप राजकीय क्षेत्रातून होत आहेत. याच पार्श्वभूमीवर काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मिळून ठाण्यातील विवियाना मॉलमधील हर हर महादेवच्या चालू शोमध्ये राडा घातला.

यातच आता मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा असलेला अभिनेता आस्ताद काळे सध्या चर्चेत आला आहे. आस्तादनं सध्या राज्यात’हर हर महादेव’चित्रपटाबद्दल सुरु असलेल्या वादावर त्याचं मत व्यक्त केलं आहे. तो म्हणाला, कुठलाही चित्रपट किंवा नाटक, पदरचे पैसे(प्रामाणिक कमाईचे) खर्च करून बघायला गेलेल्या सामान्य प्रेक्षकाला धमकावणं, मारहाण करणं हे कसलं लक्षण मानावं? या कृत्यातून काय साध्य झालं असं मानायचं?

आम्ही काय बघावं, अथवा बघू नये, हे ठरवायला आधीच censor board बसवलेलं आहे. त्यात आता या भीतीची भर??!!मी हर हर महादेव पाहिला नाहीये. त्यामुळे मी चित्रपटाबद्दल काही बोलणार नाही. पण तो बघायला जाताना अशी भीती बाळगून जायचं असेल तर अवघड आहे!!!! आपल्याच मुलुखातील रयत आपल्याच मुलुखात दहशतीखाली राहते आहे, हे फार फार अनुचित आहे हे छत्रपती शिवरायांना बोचणारं शल्य होतं. ता.क:- ते प्रेक्षक हेच मतदारही आहेत. असं त्याने म्हटलं आहे.