‘आज देशातील २१ लोकांकडे तब्बल ७१ टक्के पैसा आहे, हा भारतीय जनता पक्षाने जनतेचा केलेला विश्वासघात आहे’

पुणे – देश स्वतंत्र झाला तेव्हा जाताना इंग्रजांनी देश लुटला होता पण काँग्रेसने ७० वर्षात हा देश उभा केला. मागील ८ वर्षांपासून भाजपाचे सरकार केंद्रात असून त्यांनी ७० वर्षात उभे केलेले सर्व वैभव रसातळाला मिळवले. २०१४ साली सत्तेत येताना जनतेला भरमसाठ आश्वासने दिले पण सत्तेत येताच त्यांना त्याचा विसर पडला आणि ती तर निवडणुकीतील जुमले होते असे भाजपाने म्हटले. भाजपाने जनतेचा विश्वासघात केला. भारतीय जुमला पार्टीचे हे पाप जनतेपर्यंत पोहचवायचे आहे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Maharashtra Pradesh Congress Committee President Nana Patole) यांनी केले आहे.

हाथ से हाथ जोडो अभियानाचा प्रारंभ पुण्यातील फुले वाड्यातून झाला त्यावेळी नाना पटोले बोलत होते. या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, AICC चे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, मोहन जोशी, आमदार संग्राम थोपटे, पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष आमदार संजय जगताप, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, जेष्ठ नेते उल्हास पाटील, माजी मंत्री रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, अभय छाजेड, कमल व्यवहारे, विशाल पाटील, दीप्ती चौधरी, NSUI चे अध्यक्ष अमीर शेख, हाथ से हाथ जोडो अभियानाचे राज्याचे समन्वयक श्याम उमाळकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानात भाजपा सरकारवर एक आरोप पत्र जारी केले आहे. मोदी सरकारने गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे, रेशनवरील केरोसिन बंद केले. परदेशातून काळे धन आणू, १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात टाकू, वर्षाला दोन कोटी रोजगार देऊ, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करु अशी आश्वासने दिली होती प्रत्यक्षात रोजगार दिलेच नाहीत उलट या देशाला बेरोजगारांचा देश बनवले, शेतकऱ्यांना बरबाद केले. छोट्या व्यापाऱ्याला उद्ध्वस्त केले आणि मुठभर लोकच श्रीमंत होत गेले. आज देशातील २१ लोकांकडे तब्बल ७१ टक्के पैसा आहे, हा भारतीय जनता पक्षाने जनतेचा केलेला विश्वासघात आहे. हे सर्व जनतेपर्यंत पोहचले पाहिजे. हाथ से हाथ जोडो अभियानातून घरा घरात जा व काँग्रेस विचार पोहचवा व भाजपाचे पाप जनतेला कळू द्या.