बंडखोर आमदारांनी त्या डबक्यातून बाहेर पडावे व महाराष्ट्राच्या स्वर्गात यावे – संजय राऊत

मुंबई – शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गुवाहाटीत वास्तव्याला असलेल्या बंडखोर आमदारांना परत महाराष्ट्रात येण्याचे आवाहन सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आले आहे. हिंदुस्तान तोडून बॅरिस्टर जीनांनी पाकिस्तान निर्माण केला, पण तो देश राहिला नसून पृथ्वीवरचे एक डबकेच बनला आहे. तशीच अवस्था बंडखोर वगैरे म्हणवून घेणाऱ्या झाडी-डोंगरातील गटाची होणार आहे. असं यात म्हटले आहे.

ज्यांचा आत्मा आजही जिवंत आहे, त्यांनी त्या डबक्यातून बाहेर पडावे व महाराष्ट्राच्या स्वर्गात यावे. गुवाहाटीमध्ये झाडी-हाटेल वगैरे आहे पण महाराष्ट्रात शिवराय आणि बाळासाहेब ठाकरे (Shivray and Balasaheb Thackeray) यांचे विचार आहेत. शाहू, फुले, आंबेडकरांची भूमिका आहे. तेव्हा डबक्यातून बाहेर पडा हे पहिले सांगणे व भाजपने या डबक्यात मारू नये हे दुसरे सांगणे. महाराष्ट्रात विजय भगव्याचाच होईल. पंच्चावनशे एकशे पंचावन्न करण्याची ताकद मऱ्हाटी मनगटात आहे. विचारांचा विजय यालाच म्हणायचे असते. ‘सामनाच्या अग्रलेखात’ ही भूमिका मांडण्यात आली आहे.

शिवसेनेच्या स्थापनेनंतर राजकारणात 280 सेना निर्माण झाल्या पण गेली 56 वर्षं टिकली ती फक्त सेनाच. गुवाहाटीमध्ये झाडी डोंगर हाटेल मजा घेत जे आमदार बसले आहेत त्यांना शिवसेनेच्या या चमत्काराची जाणीव नसेल असे कसे मानायचे? आता कोर्टबाजी सुरू झाली आहे व हाटील डोंगर आमदारांवर 11 तारखेपर्यंत कोणतीही कारवाई करू नये असं न्यायालयाने सांगितलं आहे. हा एकप्रकारे दिलासाच आहे. त्या दिलाशाचे लाभार्थी कोण हे भविष्यात उघड होईलच, असं सामनाने म्हटलं आहे.