मराठी सिनेसृष्टीला जगभर पोहोचवणारे ‘हे’ आहेत ५ चित्रपट, पहिल्या क्रमांकावर…

गेल्या काही वर्षांत मराठी सिनेसृष्टीने अगदी बॉलीवूडला टक्कर देतील असे चित्रपट आणले आहेत. आता तर दिग्दर्शकांची एक नवी फळी मराठी इंडस्ट्रीत पाहायला मिळत आहे, जी नवनवे प्रयोग करत एकाहून एक उत्तम सिनेमे निर्माण करत आहे. अशाच काही चित्रपटांमुळे प्रेक्षकांचा मराठी सिनेमांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या लेखात आम्ही तुम्हाला, गेल्या काही वर्षांत बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या पाच मराठी चित्रपटांबद्दल सांगणार आहोत. या चित्रपटांनी मराठी सिनेसृष्टीला जगभर पोहोचवले आहे.

५. कट्यार काळजात घुसली-
या यादीत पाचव्या क्रमांकावर येतो, सुबोध भावे दिग्दर्शित कट्यार काळजात घुसली हा चित्रपट. या चित्रपटात सुबोध भावे, शंकर महादेवन, सचिन पिळगावकर मुख्य भूमिकेत होते. २०१५ साली रिलीज झालेल्या या चित्रपटाद्वारे मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय कट्यार काळजात घुसली या नाटकाचे मोठ्या पडद्यावर रूपांतर करण्यात आले. या चित्रपटाला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४० कोटींची कमाई केली.

४. लय भारी- 
नशिकांत कामत दिग्दर्शित लय भारी (२०१४ मध्ये रिलीज) चित्रपटाने त्याच्या नावाप्रमाणेच बॉक्स ऑफिसवर लय भारी कमाई केली. लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख हा या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाद्वारे त्याने मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केले. हा चित्रपट महाराष्ट्रात सलग १०० दिवस चित्रपटगृहांमध्ये होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४५ कोटींची कमाई केली.

३. नटसम्राट- 
बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी सिनेमांमध्ये नटसम्राटचा तिसरा क्रमांक लागतो. महेश मांजरेकर दिग्दर्शित नटसम्राट हा चित्रपट २०१६ साली रिलीज झाला. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट- असा नट होणे नाही, या नाटकावर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात नाना पाटेकर हे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५२ कोटींची कमाई केली.

२. पावनखिंड-
दिगपाल लांजेकर दिग्दर्शित पावनखिंड हा चित्रपट २०२२ साली रिलीज झाला. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांचा वीर मावळा बाजीप्रभू देशपांडे यांची कहानी दाखवण्यात आली आहे. अजय पुरकर (बाजी) हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६१ कोटींची कमाई केली.

१. सैराट- 
मराठी सिनेइंडस्ट्रीत आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा सैराट आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपट २०१६ साली रिलीज झाला. या चित्रपटातील आर्ची (रिंकू राजगुरू) आणि परश्या (आकाश ठोसर) या पात्रांना चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ११० कोटींची कमाई केली.