बारसं करायला निवडणूक आयोग काय शिवसेनेची आत्या नाहीये; उद्धव ठाकरे यांची टीका 

Mumbai – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दैनिक ‘सामना’ला परखड मुलाखत दिली आहे. खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या राज्यातील आणि देशाच्या राजकारणावर भाष्य केलं. इंडिया आघाडीवर आपली भूमिका मांडली. तसेच इर्शाळगड दुर्घटनेवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. याच मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि  शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान,  याच मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर टीका केली आहे. पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. आमचा पक्ष इतरांना देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. उद्या मी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याचं नाव बदललं तर? निवडणूक आयोगाने शिवसेनेचं बारसं केलं नव्हतं. कानात येऊन नाव सांगायला निवडणूक आयोग काय शिवसेनेची आत्या लागत नाहीये. ते नाव माझ्या आजोबांनी दिलंय. ते शिवसेना प्रमुखांनी घेतलं. म्हणून तर त्यांना शिवसेनाप्रमुख म्हणतात, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला ठणकावलं.

रामशास्त्री बाण्याचे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात आहे. आमच्या बाजूनेच निकाल दिला तर त्यांचा बाणा सिद्ध होईल असं नाही. शिवसेनेने जे कोर्टात मांडलंय ते संविधानाला अनुसरून आहे. संविधानात जे लिहिलं ते पुसून टाकता येत नाही. संविधानाच्या तरतुदीला धरूनच आहे. नाही तर तुम्हाला संविधान बदलावं लागेल. घटना बदलावी लागेल. आम्ही आता निवडणूक आयोगाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. उद्या विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात कोर्टात जाण्यासाठी दरवाजे उघडे आहेत. आणि तिकडे सर्व सुनावणी झालेली आहे, असंही ते म्हणाले.