आशिया चषकापूर्वी बाबर आझमच्या नावावर अत्यंत लाजीरवाणा विक्रम, पहा नेमकं काय झालं ?

पाकिस्तानने पहिल्या वनडेत अफगाणिस्तानचा (PAK vs AFG) पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा 142 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. अशाप्रकारे पाकिस्तानी संघ 3 वनडे मालिकेत 1-0 ने पुढे गेला आहे, मात्र या विजयानंतरही पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या (Babar Azam) नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. वास्तविक, अफगाणिस्तानविरुद्ध बाबर आझम एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये बाबर आझम शून्यावर बाद होण्याची ही चौथी वेळ (Babar Azam Duck In ODI) होती, तर कर्णधार म्हणून तो दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला.

अफगाणिस्तानविरुद्ध शून्यावर बाद झाल्यानंतर बाबर आझम याच्यासह इम्रान खान , जावेद मियांदाद, अझहर अली आणि युनूस खान या नावांचा या यादीत समावेश आहे.पाकिस्तानचा कर्णधार म्हणून हे खेळाडू दोनदा शून्यावर आऊट झाले आहेत. अशाप्रकारे आता बाबर आझम पाकिस्तानी कर्णधार म्हणून दोनदा शून्यावर आऊट झालेल्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे.

पाकिस्तानी कर्णधार म्हणून वनडेमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट होण्याचा विक्रम वसीम अक्रमच्या नावावर आहे. एकदिवसीय फॉर्मेटमध्ये, वसीम अक्रम पाकिस्तानचा कर्णधार म्हणून 8 वेळा एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतला. उर्वरित खेळाडूंकडे पाहता, इंझमाम-उल-हक आणि मोईन खान एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार म्हणून 4-4 वेळा शून्यावर आऊट झाले. याशिवाय, कर्णधार म्हणून एकदिवसीय फॉर्मेटमध्ये मिसबाह-उल-हक तीन वेळा खाते उघडू शकला नाही.