‘दगाबाजी करून मुख्यमंत्रिपद मिळवणारे उद्धव ठाकरे आता महापालिकेतून येणारे खोके बंद झाल्यामुळे ते अस्वस्थ झालेत”

मुंबई- उद्धव ठाकरेंनी दगाबाजी करून मुख्यमंत्रिपद मिळवले, आता महापालिकेतून येणारे खोके बंद झाल्यामुळे ते अस्वस्थ झालेत. उद्धव ठाकरेंची शिवसेनाच मुंबईच्या विकासाची मारेकरी असल्याची घणाघाती टीका भाजपा मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी केली. मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित ‘जागर मुंबईचा’ या अभियानंतर्गत जाहीर सभेत ते बोलत होते. वर्सोवा येथे भव्य सभा पार पडली. आमदार भारती लव्हेकर, योगीराज दाभाडकर, सरिता पाटील, रंजना पाटील, इंद्रसेन सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.(Uddhav Thackeray  got the post of Chief Minister by fraud – Atul Bhatkhalkar)

आमदार अतुल भातखळकर म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेने देवेंद्र फडणवीस यांना निवडले असताना जनतेशी विश्वासघात करून उद्धव ठाकरे यांनी महाभकास आघाडी स्थापन केली. सत्तेवर आल्यानंतर अडीच वर्षात त्यांनी मुंबईतील चालू विकास कामे बंद पाडण्याचे काम केले. महाविकास आघाडीचे सरकार पांढऱ्या पायाचं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली विकासकामे थांबवण्याचे पाप महाविकास आघाडीने केले. आता जनतेचे सरकार आले आहे. जागर मुंबईचा कार्यक्रम यांच्या डोळ्यात खूपत आहे.

आदित्य ठाकरे मुंबई महापालिकेतील टेंडरविषयी विचारतात. ५ हजार करोड रुपयांचे सिमेंटचे रस्ते बनवण्याचे काम आमच्या सरकारने हाती घेतले आहे. टेंडरमध्ये कमिशन मिळत नाही याचे दुःख आदित्य ठाकरे यांना आहे. आम्ही आमच्या कामाचा हिशोब जनतेसमोर ठेवतो. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळात  जनतेला लुटण्याचे काम झाले. कोरोना काळात पालकमंत्री आदित्य ठाकरे गायब होते. त्यावेळी भारतीय जनता पक्षाने जनतेत जाऊन काम केले. मुख्यमंत्री जनतेतही नाहीतच पण मंत्रालयातही गेले नाहीत. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जनतेत जाऊन काम केले. त्यावेळी उद्धव ठाकरे तुम्ही कुठे होता? असा सवाल आमदार अतुल भातखळकर यांनी विचारला.

मुंबईतील मेट्रो प्रकल्प रखडवण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. पर्यावरणाच्या नावावर आरे कारशेडचे काम थांबवले. आता शिंदे फडणवीस सरकारमध्ये आरे कारशेडचे काम सुरू झाले. उद्धव ठाकरे यांनी मेट्रोचे काम रोखल्याने मेट्रोच्या खर्चात दहा हजार करोड रुपयांची वाढ झाली. हा वाढीव खर्च उद्धव ठाकरे यांच्याकडून वसूल केला पाहिजे. मंत्रालयात न जाता ते बेस्ट सीएम झाले. मुख्यमंत्री मंत्रालयात जात आहेत ही ब्रेकिंग न्यूज होते ही दुर्दैवाची बाब आहे अशी टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केली.