नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चौथ्या स्थानावर गेल्यामुळे उद्धव ठाकरे हताश झाले आहेत; चंद्रकांतदादांची टीका 

पुणे – नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चौथ्या स्थानावर गेल्यामुळे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हताश झाले आहेत. आपल्या पक्षाचा ऱ्हास होताना पाहून आलेली निराशा लपविण्यासाठी ते भारतीय जनता पार्टीवर टीका करून थयथयाट करत आहेत, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पुण्यात पत्रकारांना सांगितले.

पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कालचे भाषण हे आधीच्या दसऱ्याच्या भाषणासारखेच होते. एखाद्या माणसाला आपली चूक समजली पण मान्य करता येत नसेल तर निराशेतून तो थयथयाट करतो आणि दुसऱ्याला चूक म्हणतो तसा प्रकार उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत घडला. नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चौथ्या स्थानावर गेली. तब्बल ४१ नगरपंचायतींमध्ये शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही. या निराशेतून सोडणार नाही, दाखवून देईन, आमच्या जिवावर तुम्ही मोठे झालात असे मुख्यमंत्री बोलत आहेत. पण मुख्यमंत्र्याच्या तोंडी ही भाषा शोभत नाही.

आपण हिंदुत्व सोडले नाही असे उद्धव ठाकरे यांना सांगायचे असेल तर त्यांनी ते काँग्रेसला सांगावे. मौलाना आझाद महामंडळाला निधी वाढवून देता पण अण्णासाहेब पाटील महामंडळाला मात्र निधी देत नाही. त्यामुळे  ज्या अल्पसंख्यांकांचा अनुनय सुरू केला आहे त्यांनाही हिंदुत्व सोडले नाही असे सांगावे, असा टोला  पाटील यांनी हाणला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पंतप्रधानांविषयी ज्या प्रकारे बोलत आहेत ते पाहता पटोले यांच्या मानसिक तपासणीची गरज आहे. त्यांच्या राजकारणाचा स्तर किती घसरला आहे याचा काँग्रेस पक्षाने विचार करावा. नाना पटोले यांच्या वृत्तीचा आपण निषेध करतो. भाजपातर्फे राज्यात ठिकठिकाणी पटोले यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे, असे ते म्हणाले. एका प्रश्नाच्या उत्तरात प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केले की, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीचा कोणताही प्रस्ताव नाही व तसा काहीही निर्णय झालेला नाही.