अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने पाकिस्तानात केले दुसरे लग्न, भाच्याने केला खुलासा

पाकिस्तान- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्याबद्दल मोठी बातमी पुढे येत आहे. दाऊदने पाकिस्तानात दुसरे लग्न केले असल्याचे (Dawood Ibrahim Second Marriage) समजत आहे. मात्र दाऊदने त्याची पहिली पत्नी मेहजबीन शेखला सोडचिठ्ठी दिली नसचानाही पाकिस्तानातील पठाण महिलेशी दुसरे लग्न केले आहे. लग्नानंतर दाऊदने त्याचा ठिकाणाही बदलला आहे. दाऊदची बहिण हसीना पारकर हिचा मुलगा अली शाह याने डॉन दाऊदच्या दुसऱ्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे.

दाऊदचा भाचा अली शाहने राष्ट्रीय तपास यंत्रणा-एनआयएला दिलेल्या निवेदनात ही बाब समोर आली आहे. दाऊदची बहीण हसिना पारकरचा मुलगा अली शाह याने सप्टेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेसमोर (NIA) हे वक्तव्य केले होते. अली शाहच्या मते, दाऊदने अजून त्याच्या पहिल्या पत्नीला तलाक दिलेला नाही. त्यामुळे दाऊदचे दुसरे लग्न मेहजबीनवरून तपास यंत्रणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न असू शकतो.

अली शाहने सांगितले की, तो दाऊद इब्राहिमच्या पहिल्या पत्नी मेहजबीन शेखला जुलै 2022 मध्ये दुबईमध्ये भेटला होता, जिथे त्याने तिला दाऊदने दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याबद्दल सांगितले. मेहजबीन भारतातील दाऊदच्या नातेवाईकांशी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे संपर्क ठेवते. तसेच अली शाहने एनआयएला दाऊद इब्राहिमच्या ठावठिकाणाविषयी सांगितले आणि दावा केला की अंडरवर्ल्ड डॉन कराचीमध्ये राहतो. परंतु आता त्याचा ठावठिकाणा बदलला आहे. पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्था आयएसआयने दाऊदचा ठावठिकाणा बदलला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने दाऊदला कराची शहरातीलच अन्य ठिकाणी हलवण्यात आले आहे.