‘अजिंक्यतारा’ शेतकर्‍यांना किफायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द, शिवेंद्रराजेंचा शब्द

सातारा : स्व. भाऊसाहेब महाराजांनी तालुक्यातील जनतेच्या साक्षीने आणि सहकार्याने लावलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखानारूपी रोपट्याचे आज भल्या मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे. आज जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आर्थिकदृष्ट्‌या एक भक्कम आणि सक्षम सहकारी संस्था म्हणून कारखान्याला ओळखले जात आहे.

सभासद शेतकरी आणि कामगार वर्गाचे सहकार्य, संचालक मंडळाचे काटकसरीचे धोरण यामुळेच आज आपल्या संस्थेचा नावलौकीक आहे. कारखाना उपपदार्थ निर्मीतीसाठी प्राधान्य देत असून त्यातून संस्थेचे उत्पन्न वाढत आहे. चालू गळीत हंगामातही अजिंक्यतारा कारखाना शेतकर्‍यांना किफायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द राहील, असा शब्द कारखान्याचे मार्गदर्शक संचालक शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला.

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या ३८ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याच्या जेष्ठ सभासदांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून उत्साहात पार पडला. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्‍वास शेडगे, सर्व संचालक आणि विविध मान्यवर उपस्थित होते.

कारखाना गाळपास येणाऱ्या उसाला एफआरपीनुसार वेळेत पेमेंट अदा करत आहे. इतर कारखान्यांची परिस्थिती पाहता आपल्याच कारखान्याला ऊस घालण्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल आहे आणि ही बाब आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची आहे. यंदाच्या गळीत हंगामात ७ लाख ५० हजार मे. टन. एवढ्या विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट असून हा विक्रम आपला कारखाना निश्चितच करणार आहे. गाळपासाठी सगळी यंत्रणा सक्षम झाली असून हाही हंगाम यशस्वीपणे पार पडेल यात कोणतीही शंका नाही.

कारखान्याने गाळप क्षमता वाढवण्याबरोबरच टप्प्याटप्प्याने डिस्टिलरी, इथेनॉल प्रकल्पांचेही विस्तारीकरण करण्याचे काम सुरु केले आहे. इतर कारखान्यांच्या तुलनेत आपल्या कारखान्याच्या साखरेचा दर्जा चांगला असून कारखाना दरही उच्चतम देत आहे. या हंगामात ऊसदर देताना जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या निर्णयाप्रमाणेच आपला कारखाना किफायतशीर देणार आहे. उच्चतम दर देण्याची परंपरा यंदाही कायम राहील. हंगाम यशस्वी करण्यासाठी नोंद केलेला संपूर्ण ऊस आपल्या कारखान्याला घालावा आणि नेहमीप्रमाणे हंगाम यशस्वी करण्यासाठी सभासद, शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन शिवेंद्रराजे यांनी यावेळी केले.

हे ही पहा: