रामकथा जाणण्यासाठी वाल्मिकी रामायण हेच प्रमाण ग्रंथ – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

वेदिक कॉसमॉसतर्फे तयार करण्यात आलेल्या अनोख्या ग्रंथ स्वरूपातील वाल्मिकी रामायणाचे प्रकाशन संपन्न

पुणे : देशात भावार्थ रामायण, तुलसी रामायण, कंब रामायण, ओरिया दंडी रामायण असे जवळपास २०० रामकथा लिहिण्यात आल्या आहेत. ज्या ज्या लेखकांनी आपल्या लेखणीतून रामकथेचे वर्णन केले आहे, त्या सर्वांप्रती मला आदर आहे. मात्र या राम कथांमध्ये अनेक आंतरिक भेद आहेत. या भेदांपासून दूर जाण्यासाठी आणि राम कथेबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर मिळविण्यासाठी केवळ एकच पर्याय आहे, ते म्हणजे महर्षी वाल्मिकी (Maharishi Valmiki) लिखित रामायण. ऐतिहासिक घटनेच्या रूपात रामकथा जाणून घेण्यासाठी वाल्मिकी रामायण हेच प्रमाण ग्रंथ आहे, असे मत अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी न्यासाचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govinda Dev Giri Maharaj) यांनी व्यक्त केले.

वेदिक कॉसमॉस (Vedic Cosmos) या प्रकाशन संस्थेतर्फे अनोख्या ग्रंथ स्वरूपात तयार करण्यात आलेल्या वाल्मिकी रामायणाचे (Valmiki Ramayana) प्रकाशन स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते व एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे (MIT World Peace University) संस्थापक अध्यक्षप्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृह येथे हा प्रकाशन समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी वेदिक कॉसमॉस प्रकाशन संस्थेचे संचालक शिरीष राजेश, हेमंत शेठ आणि व्हीनस ट्रेडर्सचे सुरेंद्र करमचंदानी उपस्थित होते.

यावेळी वाल्मिकी रामायणाचे महत्व सांगताना स्वामी गोविंददेव महाराज म्हणाले, महर्षी वाल्मिकी हे रामायणाचे समकालीन लेखक आहेत. त्यामुळेच रामायणाचा अभ्यास करण्यासाठी वाल्मिकी रामायण हेच मूळ रामायण आहे. या ग्रंथामधील रामकथा ही देवाची नव्हे,तर एका मनुष्याची कथा आहे. गुणवान पुरुषाचे चित्र निर्माण करणे हे वाल्मिकी रामायणाची वृत्ती आहे. सर्व मानवी मर्यादाचे पालन करतानाही, कशाप्रकारे तुम्ही प्रेम, धर्म, कर्तव्य पालन करू शकता याचे योग्य उदाहरण दिले आहे. वाल्मिकी रामायण ही चमत्कारावर आधारित रामकथा नसून, विज्ञान, अध्यात्म, व्यवस्थापन अशा सर्वच विषयांचे ज्ञान देणारी ही कथा आहे. त्यामुळेच लोकांनी खासकरून तरुण पिढीने वाल्मिकी रामायण आवश्य वाचले पाहिजे.

ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि प्रभू श्रीराम यांच्यातील संबंध सांगताना ते म्हणाले, जगात अनेक ग्रंथ झालेत, होत राहील पण संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ कोणत्याच भाषेत नाही. अगदी संस्कृतमध्येही नाही. शांतरस हा ज्ञानेश्वरीचा मुख्य रस आहे. ज्ञानेश्वरी पठण करताना डोळ्यात अश्रू असले, तरी अध्यात्मिक शांतीमुळे अंतर्मनात अमाप आनंद होतो. हे शांतरसाचे वैशिष्ट्य असते. याच शांतरसाची साकार मूर्ती म्हणजे प्रभू श्रीराम आहेत. आज संत ज्ञानेश्वर सभागृहात वाल्मिकी रामायणाचे प्रकाशन होणे हा एक विलक्षण योग आहे.

डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, रामायण  ही केवळ राम कथा नाही, तर जीवनगाथा आहे. एक राजा, एक पुत्र, एक पिता, एक पती कसा असावा? याचे मार्गदर्शन यामधून मिळते. भारतीय संस्कृती ही परंपरा तत्वज्ञान यांनी परिपूर्ण आहे. योग आणि अध्यात्म हे भारताने जगाला दिलेली मोठी देणगी आहे.आपले धर्मग्रंथ हे जीवनग्रंथ आहेत. कसे जगावे आणि कसे जगू नये हे ग्रंथ सांगतात. विज्ञान आणि अध्यात्म याचे उत्तम बांधणी या ग्रंथांमध्ये आहे. त्यामुळे तरुण पिढीने या ग्रंथाचे वाचन केलेच पाहिजे.

कार्यक्रमात शिरीष राजेश यांनी वेदिक कॉसमॉसच्या वाल्मिकी रामायणातील वैशिष्ट्यांबाबत माहिती दिली. ते म्हणाले, या रामायणाच्या निर्मितीसाठी आम्हाला पाच वर्षे लागली. एकूण दहा पुस्तकांचा संच असलेल्या या ग्रंथाच्या निर्मितीसाठी पर्यावरणपूरक आणि उच्च प्रतीच्या साधनांचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर पुस्तक संचासाठी डिझाईन करण्यात आलेला विशेष लाकडी बॉक्स, रामायणातील महत्वाच्या प्रसंगावर आधारित २०० हून अधिक उत्कृष्ट चित्रे आणि मौल्यवान स्वरोस्की क्रिस्टल्सची सजावट ही या ग्रंथाची काही महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. वाल्मिकी रामायणाच्या सात खंडातील २४,००० मूळ संस्कृत श्लोकांबरोबरच हिंदी आणि इंग्रजीतील भाषांतर देखील यामध्ये देण्यात आले आहे. हेमंत शेठ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर भारती झवेरी यांनी आभार मानले.