‘वीर सावरकर ‘वेबसिरीज सावरकर विरोधकांच्या टीकेला उत्तर असेल – सात्यकी सावरकर

'वीर सावरकर सिक्रेट फाईल्स ...' वेब सिरींजची घोषणा, वेब सिरींजचा शानदार टिझर आणि पोस्टर लॉन्च

Pune – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा संपूर्ण जीवनपट वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे ही खूप चांगली गोष्ट असून ‘वीर सावरकर द सिक्रेट फाईल्स…’ ही वेबसिरीज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांच्या टीकेला उत्तर देणारी ठरेल असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी केले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे शौर्य, बलिदान आणि त्यांच्या अमर्याद धैर्याची कहाणी असलेली भव्य हिंदी वेबसिरीज ‘वीर सावरकर: सिक्रेट फाइल्स…’लवकरच छोट्या पडद्यावर झळकणार आहे. या वेब-सिरीजची आज घोषणा करण्यात आली. त्यावेळी श्री. सात्यकी सावरकर बोलत होते. यावेळी या वेब-सिरीजचे दोन उत्कंठावर्धक टीझर आणि पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आले.

यावेळी वेब सीरिजचे लेखक आणि दिग्दर्शक योगेश सोमण , सावरकर यांची मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते सौरभ गोखले, वेबसीरिजचे निर्माते आणि डेक्कन ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. अनिर्बान सरकार, डेक्कन ए व्ही मीडियाचे संचालक अजय कांबळे, कु. साची गाढवे आदी मान्यवर उपस्थित होते.

सात्यकी सावरकर म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकर या व्यक्तिमत्त्वाकडे मागील काही वर्षांपासून दुर्लक्ष झालेले आहे. त्यांनी अनेक क्रांतीकारकांना दिलेली प्रेरणा, एखाद्या विषयाबद्दल सावरकर यांची भूमिका काय होती, त्यांचा त्याग, बलिदान हे सर्व मांडण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. वेब सीरिजच्या माध्यमातून ही भूमिका मांडण्याचे काम केले जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सावरकर यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून टीकेला उत्तर दिले जाणारच आहे. परंतु, टीकेला उत्तर म्हणून काही बनवण्यापेक्षा आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेले स्वातंत्र्यवीर प्रेक्षकांसमोर आले पाहिजेत,”

योगेश सोमण म्हणाले, “वेब सिरीज हे माध्यम सध्याचे लोकप्रिय माध्यम असून सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारे हे सशक्त माध्यम आहे. सावरकर यांचे संपूर्ण चरित्र या माध्यमातून मांडता येणार आहे. महाराष्ट्रातील लोकांना सावरकर माहित आहेत. परंतु राष्टीय पातळीवर सावरकर यांचे चरित्र, त्यांचे विचार, त्याचा त्याग समोर यावा म्हणून हिंदी भाषेत ही वेब सिरीज काढण्यात येणार आहे. ‘वीर सावरकर: सिक्रेट फाइल्स. हे नाव म्हणजे सावरकर यांच्या जीवनातील सत्य घटनांवर आधारित प्रसंग योग्य प्रमाणात दिग्दर्शकीय स्वातंत्र्य घेऊन प्रेक्षकांसमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.” असे योगेश सोमण म्हणाले. ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित वेबसिरीज नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

सौरभ गोखले म्हणाले, “एखाद्या कलाकाराला ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारायला मिळणे हे भाग्य असते. मला यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांची व्यक्तिरेखा साकारायला मिळाली. आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांची व्यक्तिरेखा साकार करण्याची संधी मिळाली आहे. या व्यक्तिरेखेचा अभ्यास, त्यांच्याबद्दलचे साहित्य वाचून अधिकाधिक चांगल्या पद्धतीने ही भूमिका साकारण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.”

डॉ. अनिर्बान सरकार म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दैवत आहे. विशेषतः ऐतिहासिक व्यक्तिमत्वांबद्दल मला विशेष आकर्षण आहे. यापूर्वी शिवाजी महाराजांचा शिलेदार कोंडाजी फर्जंद याच्यावर चित्रपट निर्माण केला. आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर वेब सीरिजचे शूटिंग लवकरच सुरु होणार असून पुढील वर्षी सावरकर यांच्या पुण्यतिथीला २६ फेब्रुवारी रोजी ही वेबसिरीज पडद्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.”

यावेळी DRDO चे माजी महासंचालक आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ.व्ही.के. सारस्वत यांचा शुभेच्छा संदेश असलेली चित्रफीत दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बागेश्री पारनेरकर आणि एकता कपूर यांनी केले. आभार साची गाढवे यांनी मानले.