विराटचं ७१वे शतक होईपर्यंत लग्न न करण्याची शपथ घेणारा चाहता चढला बोहल्यावर, कोहलीकडून ‘वेडिंग गिफ्ट’ही मिळालं

Mumbai- भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. नुकतेच विराटने श्रीलंकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २ शतके ठोकत ७४ आंतरराष्ट्रीय शतके पूर्ण केली आहेत. मात्र एक काळ असा आला होता, जेव्हा विराटला आणि त्याच्या चाहत्यांना त्याच्या ७१ व्या शतकाची डोळ्यात तेल घालून प्रतिक्षा होती. जवळपास ३ वर्षे विराटच्या बॅटमधून शतक (Virat Kohli Century) निघाले नव्हते.

या कठीण काळातही विराटच्या चाहत्यांचा त्याला पूर्ण पाठींबा होता. त्यावेळी आपल्या ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकासाठी झगडत असलेल्या विराटच्या एका चाहत्याने अनोखी शपथ घेतली होती. जोपर्यंत विराट त्याचे ७१वे आंतरराष्ट्रीय शतक करत नाही, तोपर्यंत आपण लग्न करणार नाही, असे विराटच्या एका चाहत्याने ठरवले होते. आता विराटच्या शतकांची संख्या ७१ नव्हे ७४ वर पोहोचली आहे. परिणामी विराटचा तो चाहताही (Virat Kohli Fan) बोहल्यावर चढला आहे. अमन अगरवाल (Aman Agarwal) असे त्या चाहत्याचे नाव आहे.

आशिया चषकात विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७१वे शतक पूर्ण केले. यासह विराटचा जबरदस्त चाहता असलेल्या ३४ वर्षीय अमन अगरवालला लॉटरी लागली. ७१व्या शतकानंतरही या चाहत्याला विराटकडून आणखी एक भेट मिळाली, तीही लग्नाच्या दिवशी. यासंबंधीची एक पोस्ट या चाहत्याने ट्विटरवर शेअर केली आहे.

अमनने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, मी ७१ वे शतक मागितले होते. पण, माझे लग्न आहे त्याच दिवशी विराटने ७४ वे शतक ठोकून हा दिवस आणखी खास बनवला आहे.