महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या प्रदर्शना बरोबरच केदार शिंदेच्या ‘बाईपण भारी देवा’ या आगामी चित्रपटाचा टिझर झाला रीलीज

‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीच्या विश्वाभोवती फिरणाऱ्या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावना शेअर करणारा आहे. अर्थात चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे. चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. काही कारणामुळे एकमेकींपासून विभक्त झालेल्या आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांना सामोऱ्या जाणाऱ्या या सहा बहिणींची कथा म्हणजे सर्वसामान्य आयुष्यातील सुपर वुमनची कथा आहे. आपल्या समाजात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या महत्त्वपूर्ण भूमिका त्यांच्या-त्यांच्या पातळीवर बजावत असतात पण आपलंच कळत-नकळत त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील अभिनेत्री समाजातील अशाच स्त्रियांचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत.

या चित्रपटाचा टीझर एका खास मुहूर्तावर रिलीज करण्यात आला आहे. आज २८ एप्रिल रोजी, केदार शिंदे यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer) महाराष्ट्रभरात रिलीज झाला असुन त्यांचाच आगामी बहुचर्चित चित्रपट ‘बाईपण भारी देवा’ याचा टिजर ही आज एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आला आहे.

यावर केदार शिंदे (Kedar Shinde) म्हणतात कि आपल्याकडे विविध विषयांवर सिनेमे बनवले जातात पण बायकांच्या मनाचा किंवा भावनांचा विचार क्वचितच केला जातो. तोच विचार मी अगं बाई अरेच्चा करताना केला आणि आता बाईपण भारी देवा मध्ये यातील पुढच्या टप्प्याचा विचार करून, प्रत्येक स्त्रीला तिची कथा बघतेय किंवा ही तर मीच आहे असा फील देणारी ही फिल्म आहे. आज माझा चित्रपट महाराष्ट्र शाहीर प्रदर्शित होतोय आणि त्याचबरोबर माझ्या बाईपण भारी देवा ह्या आगामी चित्रपटाचा टीझर ही दाखविण्यात येणार आहे ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. कारण पहिल्यांदाच प्रेक्षकांना एकाच वेळी माझ्या दोन वेगवेगळया विषयावर बनलेल्या सिनेमांची अनुभूती अनुभवता येईल. आणि हा योग जुळवून आणल्याबद्दल जिओ स्टुडिओज आणि माझे मित्र संजय छाब्रिया याचे मी मनापासुन आभार मानतो

जिओ स्टुडियोजचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट प्रत्येक स्त्रीला आता स्वतःसाठी देखील जगायला शिकवणार हे नक्की.. तेव्हा आता तयार रहा.. केदार शिंदेंचा स्पेशल टच असलेला सहा गुणी अभिनेत्रींनी चित्रपटात उडवलेली धमाल अनुभवायला!

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट आपल्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. सिनेमाचं नाव जसं भारी भरकम आहे तशीच सिनेमातील स्टारकास्टही तगडी आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते,सुकन्या मोने,शिल्पा नवलकर,सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशा मातब्बर अभिनेत्री एकत्र पडद्यावर पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. ‘बाईपण भारी देवा’ हा एक कौटुंबिक चित्रपट असून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करण्यासाठी ३० जून,२०२३ रोजी चित्रपटगृहात आपल्या भेटीस येत आहे.