आनंद दिघे हे घटनाबाह्य सत्ताकेंद्र होतं, लोकांना तसं असणं म्हणजे हिरो असल्यासारखं वाटतं – चौधरी 

पुणे – राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात धर्मवीर(Dharmveer)  या सिनेमाची चर्चा होताना दिसून येत आहे. ‘धर्मवीर’ या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने(prasad oak) आनंद दिघेंची(Aanand dighe) भूमिका साकारली आहे. ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून आनंद दिघेंची ओळख होती. या चित्रपटाच्या माध्यमातून आनंद दिघे यांच्या व्यक्तीमत्वामधील एक सामान्य व्यक्ती, शिवसेना कार्यकर्ता ते ठाण्यातील शिवसेनेचा सर्वात प्रमुख नेता असा प्रवास उलगडणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं आहे. तर मंगेश देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या १३ मे रोजी ‘धर्मवीर मु. पो. ठाणे’ हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. एका बाजूला या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होत असताना दुसऱ्या बाजूला सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी केलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, मराठी सिनेमा आता आनंद दिघेंपर्यंत आला आहे. (सन्माननीय अपवाद वगळता) नवे आणि प्रेक्षकांना प्रगल्भ करणारे विषय सुचणारे दिग्दर्शक कमी झाले आहेत. आनंद दिघेंवर सिनेमा निघतो पण मृणाल गोरेंवर नाही. त्याचं कारण लोकांना मनातून हुकूमशाही आवडते. आनंद दिघे हे घटनाबाह्य सत्ताकेंद्र होतं. लोकांना तसं असणं म्हणजे हिरो असल्यासारखं वाटतं. बाकी मोदी जसे नेहरूंच्या संस्था विकून गुजराण चालवत आहेत तसेच मराठी सिनेमावाले वेगवेगळ्या व्यक्ती मोडून खात आहेत. फार फरक नाही. असं चौधरी यांनी म्हटले आहे.