बीडमधील शेतकऱ्याची आत्महत्या नव्हे, हा सरकारच्या बेपर्वाईचा बळी – जगदीश मुळीक

पुणे – ग्रामीण महाराष्ट्राच्या समस्यांविषयी पूर्णपणे अज्ञानी असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या बेपर्वाईमुळेच राज्यातील अतिरिक्त ऊसाच्या गाळपाची समस्या गंभीर बनली असून बीडमधील शेतकऱ्याने ऐन उमेदीत गळफास घेऊन केलेली आत्महत्या हे ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेचे पाप आहे, असा आरोप भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (BJP city president Jagdish Mulik) यांनी आज पत्रकार परिषदेत केला. ऊस उत्पादन असेच वाढत राहिले तर  शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येईल असा इशारा महाराष्ट्रातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी अलीकडेच दिला होता. गडकरी यांच्या इशाऱ्याकडे राज्य सरकारने गंभीरपणे पाहून ऊस गाळपाचे काटेकोर नियोजन करायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

मराठवाड्यातील शिल्लक ऊसाचा अंदाज घेऊन त्याच्या तोडणीचे नियोजन करायला हवे होते. मात्र ही क्षुल्लक कारणावरून काही नेत्यांना छळण्यासाठी सूडबुद्धीचे राजकारण करण्यात रमलेल्या ठाकरे सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. या बेपर्वाईमुळेच अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला असून राज्यातील सुमारे ७० लाख टन ऊस गाळपाविना उभ्या शेतात करपून जात आहे. गाळप न झालेल्या ऊसाची नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी ७५ हजार रुपये देण्याच्या भाजपच्या मागणीकडे दुर्लक्ष करून ठाकरे सरकार शेतकऱ्याच्या हलाखीची गंमत पाहात राहिले.

अलीकडेच भाजपच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पुण्यात साखर आयुक्तालयासमोर आंदोलन करून राज्य सरकारचे या समस्येकडे लक्ष वेधण्याचाही प्रयत्न केला. पण द्वेषाच्या राजकारणात बुडालेल्या ठाकरे सरकारपर्यंत शेतकऱ्याचा आक्रोश पोहोचलाच नाही. गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्रात सुमारे ५०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या करूनही ठाकरे सरकारचे डोळे उघडलेले नाहीत. मुंबईकेंद्रीत माध्यमांनी आता बातम्यांचे प्राधान्यक्रम बदलून ग्रामीण महाराष्ट्राचा आक्रोश मंत्रालयापर्यंत पोहोचवावा, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकऱ्याचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नसेल तर आता ग्रामीण भागातील शेतकरी मुंबईवर चाल करून आपल्या समस्या मंत्रालयासमोर मांडतील असा इशारा त्यांनी दिला.

वेळेत तोडणी होऊन कारखान्याने ऊस उचलला नाही म्हणून शेतात करपणाऱ्या उसाला आग लावून नामदेव जाधव नावाच्या ३२ वर्षांच्या एका शेतकऱ्याने शेतातच गळफास घेऊन आत्महत्या (Farmer commits suicide by hanging himself in the field) केली. ठाकरे सरकारच्या निष्क्रीय कारकिर्दीचा हा थेट बळी असून शेतकऱ्यावरील अन्यायाचा विक्रम नोंदवून ठाकरे सरकारने आपल्या असंवेदनशील कारभाराचे दर्शन घडविले आहे. ऐन उमेदीत आत्महत्या करण्याची वेळ आणणाऱ्या ठाकरे सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी श्री. मुळीक यांनी गृह खात्याकडे केली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे स्वयंघोषित तारणहार आणि स्वतःस देवाचा बाप म्हणविणारे नेते आता तोंड मिटून गप्प का, असा सवालही त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केला.