छत्रपती संभाजीराजेंचं नेतृत्व आम्हाला नकोय; मराठा क्रांती मोर्चातील एक गट नाराज

संभाजीनगर – राज्यातील मराठा समाजाचे प्रश्न आणि आरक्षणावर सरकारने गुरुवारी मुंबईत एक बैठक बोलावली होती. यावेळी मराठा क्रांती मोर्चा, काही मराठा संघटनांचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजी राजे यांना सुद्धा आमंत्रण देण्यात आले होते. मात्र या बैठकीत माजी खासदार छत्रपती संभाजीराजेंनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना बोलूच दिले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. मराठा मोर्चाचे समन्वयक शिवानंद भानुसे आणि रवींद्र काळे यांच्यासह इतर समन्वयकांनी शुक्रवारी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत हे आरोप केले आहे.

छत्रपती संभाजीराजेंचं (Chatrapati Sambhajiraje) नेतृत्व आम्हाला नकोय, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) समन्वयकांनी मांडली आहे. मराठा क्रांती मोर्चाने पूर्वीपासूनच कोणाचंच नेतृत्व नाही, अशी भूमिका घेतली आहे, त्यामुळे छत्रपती संभाजीराजेंनीही या संघटनांचं नेतृत्व करू नये, अशी स्पष्टोक्ती मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे.

मराठा समाजाच्या प्रश्नावर गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीवरून आता मराठा क्रांती मोर्चात सुद्धा दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. रमेश केरे पाटील यांच्या गटाने सरकारने घेतलेले निर्णय आणि बैठकीचं स्वागत केलं आहे. तर दुसरीकडे शिवानंद भानुसे, रवींद्र काळे यांच्यासह अनेक मराठा समन्वयकांनी मात्र बैठकीत बोलू दिले नसल्याचे म्हणत, संभाजीराजेंचे नेतृत्व मान्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

शिवानंद भानुसे म्हणाले, मराठा समाजाच्या प्रश्नांवर राज्य शासनातर्फे गुरुवारी एक बैठक बोलावली होती. मुंबईत झालेल्या या बैठकीत औरंगाबादमधून सुनील कोटकर, प्रा. चंद्रकांत भराट, सतीश वेताळ आणि स्वतः भानुसे यांना बोलावण्यात आले होते. कोटकर, भराट आमि वेताळ यांना बैठकीमध्ये प्रवेशच देण्यात आला नाही. बैठक सुरु होण्याच्या आधीच छत्रपती संभाजीराजे यांनी बैठकीत कुणीही बोलू नका, नाही तर मी बैठक सोडून निघून जाईन, असे सांगितले. अशा प्रकारे प्रत्येकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप त्यांनी केला.

छत्रपती संभाजीराजे सर्वव्यापक बैठका घेत नाहीत, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी केला. ते म्हणाले, ‘ नेतृत्व सर्वसमावेशक असलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. पहिल्यापासून सगळे एकत्र होते. कालच्या बैठकीत एकही माणूस नव्हता. आमचं कुणीही नेतृत्व नाही. छत्रपती शिवराय हेच आमचं नेतृत्व. तुम्ही तुमच्या बैठका रात्रीच्या अंधारात घेता. सर्व व्यापक बैठका का घेत नाहीत? सर्वांना का बोलवत नाहीत? मोजक्या चेहऱ्यांसमोर काय चर्चा चालवली आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.