Sharad Ponkshe | ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यावर शरद पोंक्षे यांची भलीमोठी पोस्ट, म्हणाले…

Sharad Ponkshe | बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा याच्या स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar ) या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशासाठी दिलेला स्वातंत्र्य लढा व त्यांचं संपूर्ण जीवनकार्य या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. सध्या देशभरातील विविध मान्यवर या चित्रपटाविषयी आपलं मत मांडत आहेत. जेष्ठ मराठी अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनीही चित्रपट पाहिल्यावर काय वाटलं याबाबत आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे

शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांची पोस्ट जशीच्या तशी….

स्वातंत्र्यवीर सावरकर – एक ध्रुवतारा
काल रात्रीपासून अस्वस्थ आहे फार, झोपेतही सतत वीर सावरकर आठवत होते. खरं तर रणदीप हूडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर ह्या चित्रपटाविषयी इतकं काही लिहून आलंय की परीक्षण म्हणून फार काही वेगळं लिहिता येईल असं मला (Sharad Ponkshe) वाटत नाही. हे मुक्त चिंतन आहे, चित्रपटाच्या अनुषंगाने आलेलं.

सावरकर फार लवकर माझ्या आयुष्यात आले. आमच्या घरात सावरकरांची बरीच पुस्तकं होती, त्यातलं ‘माझी जन्मठेप’ मी नववीत असताना वगैरे वाचलं असेल. उन्हाळ्याच्या सुट्टीत एकिकडे तोंडात काजू किंवा आंब्याची साठं चघळत निवांत पुस्तकं वाचायची अशी मला सवय होती तेव्हा पण ‘माझी जन्मठेप’ वाचताना इतका त्रास झाला होता की खाणं-बिणं तर सोडाच पण कोलूची, एकलकोठडीची वर्णनं वाचताना हमसून हमसून रडले होते मी. बारीची परपीडक वृत्ती तेव्हाही चीड आणणारी होती, पण ह्या सर्व दुःखदायक भावनांना पुरून उरेल अशी सावरकरांची विजिगीषू वृत्ती ही त्या कोवळ्या वयातही प्रेरणा देणारीच होती.

माझी जन्मठेप वाचताना माझ्या कल्पनेत मी अंदमानच्या त्या काळकोठडीतल्या नरकयातना जश्या उभ्या केल्या होत्या त्याहून किती वाईट यातना प्रत्यक्षात सावरकरांना भोगाव्या लागल्या होत्या हे काल स्क्रीनवर त्याची एक झलक पाहताना प्रकर्षाने जाणवलं. सारखे सारखे डोळे भरून येत होते, दुःख, चीड, बारी आणि जेलरबद्दलची घृणा आणि सावरकरांबद्दलचा आदर ह्या सर्व भावना एकाच वेळी मनात दाटून येत होत्या आणि परत परत मी स्वतःला बजावत होते, की आपण जे अर्ध्या तासात पडद्यावर बघून संपवतोय ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तब्बल दहा वर्षे अंदमान मध्ये भोगले होते. जे हरामखोर आज सावरकरांना ’माफीवीर’ म्हणून हिणवतात त्यांनी एक दिवस अंधारकोठडीत घालवून दाखवावा. सावरकर हे एकमेव राजबंदी असे होते ज्यांना सहा वेळा अंदमान मध्ये सॉलिटरी मध्ये ठेवले गेले.

चित्रपटात एक प्रसंग दाखवलाय, जेलमधले कुजलेले, सडलेले, निकृष्ट प्रतीचे अन्न इतकी वर्षे खाल्ल्यानंतर शेवटी त्यांची सुटका झाल्यानंतर सावरकर घरचे अन्न यमुनाबाई ताटात वाढताना बघतात तेव्हा ती साधी भाजी-भाकरी पाहून त्यांचा बांध फुटतो. इतक्या अनन्वित छळानंतरही डेव्हिड बारीच्या डोळ्यात डोळे घालून ’आय आऊटलास्टेड यू बारी’ म्हणणारे कणखर सावरकर भावनिक दृष्ट्या क्षणभर विकल होतात ते त्या क्षणी. भारतीय लोकांचा करंटेपणा की ते सावरकरांना सोडून गांधींसारख्या दुबळ्या मनाच्या नेत्याच्या मागे गेले!

ह्या चित्रपटात गांधी पहिल्यांदा जसे होते तसे दाखवले गेलेत, अहंमन्य, अहिंसेचा अतिरेकी कैवार घेणारे, सदैव मुसलमानांचे लांगूलचालन करणारे, काँग्रेसमध्ये आपल्या आणि आपल्या लाडक्या जवाहरशिवाय दुसऱ्या कुणाही नेत्याला मोठे न होऊ देणारे, मातीचे पाय असलेले सामान्य कुवतीचे नेते म्हणून गांधी ह्या चित्रपटातून आपल्या समोर येतात, आणि म्हणूनच ‘गांधी इतना बडा हो गया’ ह्या सावरकरांच्या प्रश्नातला उपरोध आपल्याला बोचतो.

चित्रपटात जेव्हा सावरकर विचारतात की ब्रिटिश सरकार तर्फे अंदमान मध्ये काळ्या पाण्याची सजा भोगायला केवळ क्रांतिकारकांनाच का पाठवले गेले? काँग्रेसच्या एकही नेत्याला काळ्या पाण्याची सजा का झाली नाही? एकही काँग्रेसचा नेता फासावर का गेला नाही? त्या प्रश्नाला काय उत्तर आहे कोणाकडे?

चित्रपटात जेव्हा कोवळी कोवळी अठरा-वीस वर्षांची मुले हसत हसत फासावर जाताना दिसतात तेव्हा जीव तुटतो. चापेकर बंधू, मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे, खुदीराम बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव… किती उड्डाण पूल आहेत आज भारतात त्यांच्या नावाने बांधलेले, किती संस्था? किती विमानतळ? किती सरकारी योजना? किती रस्ते? विचारा हा प्रश्न स्वतःलाच!

सावरकर आणि इतर क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक हयांच्या नशीबी अंदमानची कालकोठडी आणि गांधीचा ‘तुरुंग’ म्हणजे पुण्याचा आलिशान ‘आगाखान पॅलेस’, असे का? गांधींच्या लाडक्या नेहरूंसाठी नगरच्या किल्ल्यात स्वतंत्र स्वयंपाकी होता, त्यांना दिवसातून दोन तास बॅडमिंटन खेळण्यासाठीखास कोर्ट बनवले होते, नेहरूंना गुलाब आवडतात म्हणून नगरच्या किल्ल्यात खास गुलाबाची बाग जोपासायला ब्रिटिशांनी परवानगी दिली होती. आणि सावरकरांच्या नशिबी? दिवसातून आठ तास कोलूला जुंपून तेल काढणे! तितके तेल निघाले नाही तर पाठ चाबकाने फोडून काढली जायची.

अजूनही मला समजत नाही, वीर सावरकरांबद्दल ह्या देशातल्या काही लोकांच्या मनात इतका पराकोटीचा द्वेष का? त्यांच्या त्यागाचा ना कधी स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फायदा करून घेतला ना त्यांच्या मुला-नातवंडांनी. सत्तेच्या राजकारणापासून सावरकर कुटुंब कायमच ठरवून दूर राहिले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

सावरकर त्यांच्या उत्तरआयुष्यात जातीअंतासाठी आणि हिंदू एकतेसाठी लढले. भारत सरकारकडे ना त्यांनी कधी सरकारी सवलती मागीतल्या, न स्वतंत्र भारताच्या कुठल्या पंतप्रधानाने त्यांना भारतरत्न देऊ केले! उलट स्वतंत्र भारतातही ज्यांना दोनदा कारावास भोगावा लागला असे सावरकर हे एकमेव स्वातंत्र्यसैनिक! ज्या देशासाठी इतके कष्ट सोसले त्या देशाने, तिथल्या राज्यकर्त्यांनी काय दिलं सावरकरांना? सन्मान तर सोडाच, दिल्लीतल्या निर्बुद्ध राष्ट्रीय पप्पू पासून ते महाराष्ट्रातले गल्लीतल्या गटारात वळवळण्याची देखील लायकी नसलेले क्षुद्र शेणकिडे त्यांच्यावर सतत खोटे निरर्गल आरोप करतात, सत्य सर्व बाहेर आलेले असूनही.

सावरकर गेले. त्यांच्या वाट्याला जितके भोग आले ते धीरोदात्तपणे भोगून, शांतपणे, स्वतःच्या अटींवर प्रायोपवेशन करून गेले. सूर्यावर थुंकण्याचा गांडूळांनी कितीही प्रयत्न केला तरी गांडूळ गांडूळच असतं. चिमूटभर मीठ टाकलं तर तडफडतं. पण तरीही इतका आंधळा द्वेष का?

रणदीप हूडाने हा चित्रपट बनवून भारताच्या पुढच्या पिढयांवर अनेक उपकार केलेले आहेत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या क्षितिजावर उगवलेला विनायक दामोदर सावरकर हा तेजस्वी ध्रुवतारा हा होता तरी कसा हे पुढच्या पिढ्यांना बघता तरी येईल. चित्रपटात रणदीप हूडा कुठेच दिसत नाही, दिसतात फक्त सावरकर, पडदा दशांगुळे व्यापून वर पुरून उरलेले. चित्रपट पाहिला नसेल तर नक्की बघा, तुमच्याबरोबर इतरही लोकांना घेऊन जा. स्वातंत्र्यवीर सावरकर हा केवळ एक चरित्रपट नाही, तो स्वतंत्र भारताचा खरा इतिहास आहे, आजवर तुम्हाला कोणीही न सांगितलेला!

महत्वाच्या बातम्या :

ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार?

Murlidhar Mohol : …ही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक : मुरलीधर मोहोळ

Ajit Pawar | आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार