श्री गंगाधर स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त डीएम फाउंडेशनतर्फे ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान सप्ताह

DM Foundation: परमपूज्य सद्गुरू श्री गंगाधर स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त डीएम फाउंडेशनतर्फे विशेष सप्ताहाचे आयोजन केले आहे. शैक्षणिक, सामाजिक व अध्यात्मिक उपक्रमांतून बुधवार, दि. ३१ जानेवारी ते मंगळवार, दि. ६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत हा सप्ताह होणार आहे, अशी माहिती फाउंडेशनच्या (DM Foundation) उपाध्यक्ष कुमारी सुवर्णा बालेघाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी नरहर शिदोरे, संजय देशमुख, ऋग्वेदी साखरे, अनुष्का सरडे, किरण खरात आदी उपस्थित होते.

सुवर्णा बालेघाटे म्हणाल्या, “सद्गुरु श्री गंगाधर स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीचा हा सप्ताह पारंपारिक पद्धतीला बगल देऊन सामाजिक, शैक्षणिक व अध्यात्मिक अंगाने पुणे शहराच्या विविध ठिकाणी साजरा केला जाणार आहे. सप्ताहाचे उद्घाटन ‘जात असावी की नसावी’ या विषयावरील व्याख्यानेने ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात होणार आहे. करवीर पीठाचे शंकराचार्य, ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे, सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार, पत्रकार दत्ता जाधव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अध्यक्षस्थानी देशभुख महाराज असणार आहेत.”

“दुसऱ्या दिवशी १ फेब्रुवारीला सारसबाग येथे सकाळी ८ ते २ या वेळेत ‘गोसंवर्धनातून विश्वगुरू साकारणार’ विषयावर निबंध स्पर्धा होईल. तिसऱ्या दिवशी पाबळ येथील मूकबधिर मुलांची रामदरा व थेऊर गणपती येथे सहल जाणार आहे. चौथ्या दिवशी सारसबाग येथेच सकाळी ८ वाजल्यापासून जिल्हास्तरीय आंतरशालेय सूर्यनमस्कार स्पर्धा होणार आहे. जवळपास एक हजार विद्यार्थी सूर्यनमस्कार स्पर्धेत सहभागी होतील. याप्रसंगी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टर अरुण दातार, शाम साहनी आदी उपस्थित राहणार आहेत. पाचव्या दिवशी मातोश्री व निवारा वृद्धाश्रमात आजी-आजोबांशी हितगुज व अल्पोपहाराचा कार्यक्रम होईल. यावेळी आजी-आजोबांची फॅशन परेड काढण्यात येणार असून, सर्व वृद्धांसाठी नेत्र चिकित्सा शिबिरही आयोजिले आहे,” असे त्यांनी नमूद केले.

सप्ताहात सहाव्या व सातव्या दिवशीचे उपक्रम पानशेत येथील गिवशी गावातील साधना आश्रम मठामध्ये होणार असून, त्यामधेय शिवलीलामृताचे पारायण, सत्संग, लघु रुद्राभिषेक, गोपूजन व महाप्रसाद असे अध्यात्मिक उपक्रम आयोजिले आहेत. सप्ताहात होणाऱ्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ २१ फेब्रुवारीला राजीव गांधी ई लर्निग स्कूल शिवदर्शन येथे होणार आहे, असे नरहर शिदोरे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

गंगावेस तालीम देशातील दर्जेदार तालीम बनवणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

ओबीसी समाजामध्ये सध्या भीतीचे वातावरण, ओबीसींच्या मुलांच्या तोंडचा घास हिरावला जातोय – छगन भुजबळ